रत्नागिरी : पंचायत समितीच्या कार्यालयात बसून प्राथमिक शाळांचे आॅडिट करणाऱ्या लोकल फंडाच्या अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांनी कानउघाडणी केली़ त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना शाळेत जाऊन आॅडिट करुन अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले़जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो़ या शालेय पोषण आहाराची तपासणी लोकल फंडाकडून करण्यात येते़ ही तपासणी या अधिकाऱ्यांकडून प्रत्येक शाळेत जाऊन करणे आवश्यक आहे़ मात्र, तशी न करता ते दरवर्षी पंचायत समितीच्या कार्यालयात बसून करतात़ त्याचा त्रास शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांना सहन करावा लागतो़ कारण शालेय पोषण आहाराचे संपूर्ण रेकॉर्ड पंचायत समितीमध्ये आणताना मोठी कसरत करावी लागते़लोकल फंडाकडून आलेल्या अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याची तक्रार पालकमंत्री उदय सामंत हे ई-लर्निंगचे सादरीकरणाच्या कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांच्याकडे करण्यात आली़ कार्यक्रमानंतर त्यांनी पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली़ त्यावेळी लोकल फंडच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली़ त्यानंतर कार्यालयात बसून तपासणी न करता शाळेत जाऊन ती करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली. पालकमंत्र्यांच्या अचानक भेटीने लोकल फंडाच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती़ यावेळी सामंत यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. (शहर वार्ताहर)पालकमंंत्री उदय सामंत यांनी अचानक भेट दिल्याने बेसावध असलेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. एवढेच नव्हे तर पालकमंत्री काही विचारतील, याची सुतरामही कल्पना नसलेले अधिकारी कोऱ्या पाटीनेच पालकमंत्र्यांना सामोरे गेले. त्यामुळे अनेक बाबी पालकमंत्री उदय सामंत यांनी उघड केल्या. सामंत यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांची अक्षरश: तारांबळ उडाली.-शाळेत जाऊन तपासणी करण्याच्या सूचना-पंचायत समितीच्या कार्यालयात बसून शाळांची तपासणी-लोकलच्या अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी-लोकल फंडाकडून आलेल्या अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याची तक्रार ई-लर्निंग कार्यक्रम सादरीकरणाच्यावेळी करण्यात आली.
अधिकाऱ्यांची कानउघाडणी, पालकमंत्र्यांकडून तंबी :
By admin | Published: July 21, 2014 11:26 PM