रत्नागिरी : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्याचे अतिशय अवघड असे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू झाले आहे. मात्र, याचा परिणाम प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर झालेला दिसत नाही. काही शासकीय अधिकारी याबाबत बेफिकिरी दाखवत जिल्ह्याबाहेर मनमानी प्रवास करून तपासणीविना जिल्ह्यात येत आहेत.जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता १४९९पर्यंत पोहोचली आहे. रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यात स्थानिकांची संख्याच अधिक असल्याने जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या दहशतीखाली नागरिक वावरत आहेत. त्यातच कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही आता ४९ वर पोहोचली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण आणताना आरोग्य यंत्रणा बेजार होत आहे. डॉक्टरांसह आरोग्य यंत्रणेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी अथक लढा सुरू आहे.जिल्हा कोरोना संकटातून जात असताना खुद्द प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच याचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. काही अधिकारी रत्नागिरीतून अन्य जिल्ह्यांमध्ये जात आहेत व पुन्हा परतत आहेत. मात्र, कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचा त्यांना हेतुपुरस्सर विसर पडलेला दिसतो. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक अधिकारी असे परतले असून, स्वत: विलगीकरणात न राहता कार्यालयात येत आहेत.हे अधिकारी दौरे करून आल्यानंतर थेट कार्यालयात येत असल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाबाधित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करण्याची सक्ती करण्यात येत आहे.
मात्र, या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी हे नियम नाहीत का, असे नागरिकांकडून विचारले जात आहे. काही अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही हिणकस वागणूक दिल्याची माहिती मिळत आहे.अधिकाऱ्यांची विनापास फिरती?सध्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र, हे अधिकारी आपल्या अधिकाराचा वापर करून विनापास किंवा विनापरवानगी प्रवास करीत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांसह त्यांचे वाहनचालक बाधित होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.