रत्नागिरी : ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ या घोषणेनुसार मंगळवार, दि. १४ मार्चपासून सरकारी व निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी राज्यभर संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील १५ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कारभार ठप्प झाला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली.जुनी पेन्शन योजना लागू करा, तसेच पीएफआरडीए कायदा रद्द करा, कंत्राटी अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व विभागातील सर्व रिक्त पदे भरण्यास तत्काळ मान्यता द्यावी, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना विनाशर्त मान्यता देण्यात यावी, चतुर्थ श्रेणी वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवावी, शिक्षक-शिक्षकेतर पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, कामगार कायद्यातील बदल केलेल्या जाचक अटी तत्काळ रद्द कराव्यात, अशा प्रमुख मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.या संपात जिल्ह्यातील १५ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. महसूल कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, आराेग्य विभागाचे कर्मचारी या संपात उतरल्याने संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. संपामुळे कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत हाेता. संपकरी कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा माेर्चा काढला. हा माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर कर्मचारी एकत्र आले व त्यांनी जाेरदार घाेषणाबाजी केली.
जुनी पेन्शन योजना: रत्नागिरी जिल्ह्यातील १५ हजार कर्मचारी संपावर, प्रशासकीय कारभार ठप्प
By शोभना कांबळे | Published: March 14, 2023 1:07 PM