खेड : वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलमधील ओम शिंदे याने राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट फाइट स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. श्रीनगर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात त्याची निवड झाली आहे. त्याने ७० ते ७५ गटात फाइट खेळात निर्विवाद वर्चस्व मिळविले. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. एस. अली, शैक्षणिक समन्वयक व्ही. एच. तिसेकर, प्राचार्य डॉ. खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ज्ञानदीपमध्ये ३ रोजी दीक्षांत समारंभ
खेड: ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयात ३ एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे, रत्नागिरी मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यांनी केले आहे.
आंबये भैरी कोटेश्वरी मानाई उत्सव साधेपणाने
खेड : तालुक्यातील आंबये येथील श्री देवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई देवस्थानचा शिमगोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय देवस्थानच्या वार्षिक सभेत घेण्यात आला. दि. २९ मार्च रोजी सकाळी ७ वाजता विश्वस्त, मानकरी, ग्रामस्थ अशा मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत होम करण्यात येईल. सायंकाळी सहाण भरल्यानंतर पालखी मानावर जाईल. सात दिवस पालखी भेटीसाठी मानकरी, ग्रामस्थ यांच्याकडे जाईल. दि. ५ एप्रिल रोजी साधेपणाने सायंकाळी ७ वाजता मानकरी, विश्वस्त, ग्रामस्थ आदी मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत शिंपणे कार्यक्रम होऊन शिमगोत्सवाची सांगता होईल.