फोटो : खेडच्या ओम सुनील शिंदे याला राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत रौप्य पदकाने गौरविण्यात आले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : पिंच्याक सिलॅट फेडरेशन ऑफ इंडिया व जम्मू काश्मीर पिंच्याक सिलॅट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जिल्हा पिंच्याक सिलॅट असोसिएशनचा खेळाडू ओम सुनील शिंदे याने ज्युनिअर गटामध्ये रौप्यपदक पटकावले. त्यामुळे त्याची इंडोनेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फाईट स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे.
ओम शिंदेच्या गटामध्ये संपूर्ण भारतामधून तीस खेळाडू सहभागी झाले होते. त्याला पाच राऊंड अंतिम फेरीपर्यंत खेळावे लागले. सर्वच राऊंडमध्ये सर्वोत्कृष्ट फाईटचे प्रदर्शन करीत त्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना नमविले व अंतिम सामन्यात अवघ्या एक गुणाच्या फरकाने त्याला रौप्यपदक स्वीकारावे लागले. परंतु त्यांच्या सर्व फाईटमधील कामगिरीची दखल घेऊन ओम शिंदेची भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे खेडची वैष्णवी जागडे, दापोलीमधील भक्ती माळी, शर्वरी
गोफणे यांनी कांस्यपदक पटकावले. श्रीनगर काश्मीर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी संपूर्ण भारतामधून दोन हजार चारशे खेळाडूंनी सहभाग घेतला
होता. या खेळाडूंना जिल्हा प्रशिक्षक सायली शिंदे व सुरेंद्र शिंदे यांच्यासह संघटना अध्यक्ष पी. एच. बाेराटे, उपाध्यक्ष डाॅ. विजय माने यांचे मार्गदर्शन लाभले.