रत्नागिरी: अक्षयतृतीयेनिमित्त आज, शुक्रवार (दि.१०) श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील गणपत्तीबाप्पाची आंब्याने पूजा करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात आंब्याची आरास करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरातील सिध्देश विजय वैद्य व मंजिरी वैद्य यांनी पूजेसाठी पिकलेले आंबे पाठविले आहेत. वैद्य कुटूंबियांकडून गेली दहा बारा वर्षे गणपतीसाठी आंबे पाठविण्यात येत आहे.वैद्य कुटूंबियांच्या आंब्याचा व्यवसाय असून गणपतीवर त्यांची अपार श्रध्दा आहे. दरवर्षी पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती व गणपतीपुळे येथील मंदिरात दोन डझनचा आंबा प्रसादासाठी पाठवितात. सिध्देश वैद्य यांचा हा उपक्रम गेली १० ते १२ वर्षे सुरू आहे. मात्र सिध्देश यांना गणपतीपुळ्यातील गणेश मंदिरात आंब्याची आरास करण्याची संकल्पना सुचली. त्यांनी तेथील पुजाऱ्यांना याबाबत विचारले, तेव्हा त्यांनीही सकारात्मकता दर्शविली. दरवर्षी आंब्याच्या हंगामात एखादा चांगला दिवस पाहून आंब्याने बाप्पाची पूजा केली जाते. आंब्याच्या पूजेचा हा उपक्रम आठ वर्ष सुरू आहे.यावर्षी अक्षयतृतीयेला पूजा बांधण्याचा निर्णय घेतला त्यासाठी गुरूवारी (दि.९) नऊ डझन पिकलेले आंबे त्यांनी गणपतीपुळे येथे पूजेसाठी पाठविले. गणपतीमंदिरातील आंब्याची आरास पाहण्यासाठी भाविकांनीही गर्दी केली होती. कित्येक भाविकांनी मोबाईलमधून पूजेचे फोटो टिपले आहेत.आंबा हंगामातील कामामुळे दरवर्षी पूजेसाठी खास जाता येत नाही. परंतु हंगाम संपल्यानंतर आवर्जून संपूर्ण कुटूंबासह दर्शनासाठी जात असल्याचे सिध्देश यांनी सांगितले. गणपतीवर माझी व माझ्या कुटूंबियांची मनोभावे श्रध्दा आहे, श्रध्देतूनच आम्ही आंबे पूजेला पाठवित आहोत, असे सांगितले.
Ratnagiri: अक्षयतृतीयेनिमित्त गणपतीपुळेत गणपत्तीबाप्पास आंब्याची आरास
By मेहरून नाकाडे | Published: May 10, 2024 4:02 PM