रत्नागिरी : येथील भारतीय तटरक्षक वायु दलाने भारत सरकारच्या 'मिशन लाइफ' अंतर्गत 'स्वच्छ सागर अभियाना'चा एक भाग म्हणून मांडवी बीच आणि भाट्ये बीच येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविली. गणेशविसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी विविध आस्थापनांच्या सहकार्याने तटरक्षक दलाने हा उपक्रम राबविला.भारतीय तटरक्षक वायु अवस्थान, रत्नागिरीचे कमांडंट विकास त्रिपाठी (कमांडिंग ऑफिसर) यांच्या मार्गदर्शनाखाली भाट्ये समुद्रकिनारा आणि मांडवी समुद्रकिनारा येथे स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. यावेळी तटरक्षक दलाचे अधिकारी व जवान यांच्यासोबतच बॅंक आॅफ इंडिया, आकाशवाणी, आयकर कार्यालय, सीमाशुल्क, कोकण रेल्वे, दीपस्तंभ, पंजाब नॅशनल बॅंक, भारतीय स्टेट बॅंक, सेंट्रल बॅंक, आणि रत्नागिरी नगर पालिका सदस्य उपस्थित होते.गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यांवर गणेशभक्तांकडून निर्माल्यासह पुजेचे साहित्य इतरत्र टाकले जाते. त्यामुळे किनाऱ्यांवर अस्च्छता पसरते. त्यामुळे परिसराची स्वच्छता करण्यासोबतच, असुरक्षित सागरी अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छ समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेचा हा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी दोन्ही किनाऱ्यांवर असलेला प्लास्टिक बाटल्या, पुजेचे साहित्य आधी संकलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ च्या अभियानाच्या अंतर्गत अनुषंगाने, भारतीय तटरक्षक दलातर्फे सातत्याने देशभरात समुद्रकिनारी स्वच्छता उपक्रम राबविले जातात.
गणेशविसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी किनारे झाले स्वच्छ, रत्नागिरी तटरक्षक दलाच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम
By शोभना कांबळे | Published: September 25, 2023 1:42 PM