दापाेली : महाड तालुक्यातील लग्न उरकून शिवनारी-सुतारवाडी (ता. दापाेली) येथे येत असताना कार दुसऱ्या कारवर आदळून झालेल्या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी (२७ मार्च) सायंकाळी ४:३० वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गाेवा महामार्गावरील लाेहारमाळ (ता. पाेलादपूर) नजीक झाला. जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींपैकी दोघांना गंभीर दुखापत झालेल्यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथे पाठविण्यात आले आहे.
चालक सुमित विष्णू कासेकर (३२, रा. शिवनारी-सुतारवाडी, दापाेली) हे कार (एमएच ०६ बीई ७६०५) घेऊन महाड तालुक्यातील बारसगाव तळीये येथे लग्न समारंभासाठी गेले हाेते. लग्न समारंभ उरकून सर्व कुटुंब दापोलीकडे परत येत हाेते. लोहारमाळ गावाच्या हद्दीत कार आली असता रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या दुसऱ्या कार (एमएच ०४ इडी ००६४) वर भरधाव वेगाने आदळून अपघात झाला.
या अपघातात कार चालक सुमित विष्णू कासेकर यांच्यासह प्रियंका भूषण कासेकर (३०), शिवांश भूषण कासेकर (४), आदित्य सुमित कासेकर (४), मयुरी भूषण सुतार (२७), भूषण दत्ताराम कासेकर, पल्लवी सुमित कासेकर, आराध्या भूषण कासेकर (९), संपदा दिलीप देवघरकर (२७) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींच्या हाताला, पायाला, डोक्याला, कमरेला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून, सर्व जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी डेरवण येथे हलविण्यात आले आहे.