रत्नागिरी : वाहनाच्या कर्जाचे हप्ते थकल्याने प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कळंबणी बुद्रूक (ता. खेड) येथील वडाचे रान येथे घडली. हा प्रकार २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता उघडकीला आला. महेश कृष्णा हंबीर (३८, रा. कळंबणी बुद्रूक, हंबीरवाडी, खेड) असे प्रौढाचे नाव आहे. कर्जाचे हप्ते थकल्याने आत्महत्या केल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.याबाबतची माहिती महेश याचा भाऊ अजित कृष्णा हंबीर (४१) यांनी पोलिसांना दिली. महेश हंबीर याने कर्ज काढून टेम्पो खरेदी केला होता. खरेदी केलेल्या टेम्पोच्या कर्जाचे हप्ते थकल्याने तो २९ सप्टेंबर २०२२ सकाळी ८ वाजता कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र त्याचा कोठेच शोध न लागल्याने १७ ऑक्टोबर २०२२ रोजी खेड पोलीस स्थानकात बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली होती.त्याचा भाऊ अजित २६ नोंव्हेंबर रोजी सकाळी शेतीच्या कामासाठी पंप पाण्यात सोडण्यासाठी नदीवर वडाचे रान या ठिकाणी गेले होते. पंप पाण्यात सोडत असताना त्यांना महेश याची चप्पल त्या ठिकाणी दिसली. याबाबत त्यांनी खेड पोलिसांना माहिती दिली असता खेड पोलीस स्थानकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात महेश याचा शोध घेतला असता तेथीलच काजूच्या झाडाला दोरी बांधलेली दिसली. तसेच दोरीखाली रानात हाडे पडलेली दिसली.त्याच ठिकाणी महेश याचे कपडे, पाकीट, बेल्ट, पॅनकार्ड, टी-शर्ट, पॅण्ट व रुमाल या वस्तू आढळल्या. या वस्तूंची पाहणी केली असता त्या महेश याच्याच असल्याचे त्याच्या भावाने सांगितले. यावरून महेश याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी खेड पोलिस स्थानकात २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:२९ वाजता आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.
भाऊ सापडला पण मृतावस्थेतमहेश हंबीर हा २९ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. तो आज ना उद्या घरी येईल या आशेवर त्याच्या घरचे होते. त्याचा शोध घेतल्यानंतर १७ ऑक्टोबरला पोलिसांना माहिती दिली. मात्र, तो घरी आलाच नाही. त्याच्या भावाला तब्बल ५८ दिवसांनी त्याची चप्पल सापडली आणि भाऊ सापडेल अशी आशा होती. रानात शोध घेतल्यानंतर भाऊ सापडला होता, पण तो मृतावस्थेत. याचा भावाला धक्का बसला.