चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी सर्व स्तरातून मदत होत असतानाच येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने तब्बल १ कोटी रुपयांची भरघोस मदत केली आहे. जिल्ह्यात एखाद्या संस्थेकडून एवढ्या मोठ्या स्वरूपाचा निधी प्रथमच मदत स्वरूपात देण्यात आला आहे.येथील चिपळूण नागरी पतसंस्थेच्या सहकार वैभव या सभागृहात सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळत हा कार्यक्रम पार पडला. संस्थेचे चेअरमन सुभाष चव्हाण यांच्या हस्ते प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे एक कोटीचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. त्यानंतर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून ४ लाख रुपयांचा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनला तर सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यातर्फे पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी एक लाखाचा निधी देण्यात आला.यावेळी संस्थेचे चेअरमन चव्हाण म्हणाले की, कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोेठे फटका बसला असून, भविष्यात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. गोरगरीब जनतेला अशा परिस्थितीत मदत न मिळाल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तेव्हा कर्तव्य म्हणून प्रत्येकाने आपली भूमिका बजावणे आवश्यक आहे. आतापर्यंत अनेक संकटात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने मदतीचा हात दिला आहे.यानंतर प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी एखाद्या संस्थेने एवढ्या मोठ्या स्वरूपाची मदत शासनाला देणे हे आपल्या सेवा कारकिर्दीत प्रथमच अनुभवत आहे. या संस्थेचे सहकार व सामाजिक क्षेत्रात नाव ऐकून होतो. मात्र आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचे त्यांनी स्पष्ट करत या मदतीसाठी त्यांनी प्रशासनाच्यावतीने आभार व्यक्त केले. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी या संस्थेने प्रशासनाला व विशेषत: पोलीस यंत्रणेला मदत दिल्याबद्दल गौरवोद्गार काढले.