मनोज मुळ्ये------नि वडणुका जवळ आल्या की, सगळं वातावरण हळूहळू बदलू लागते. पाच वर्षात दुर्लक्ष केलेल्या कामांची आठवण होते. भूमिपूजनांची संख्या वाढायला लागते. पाच वर्षात समोर आल्यानंतरही न दिसणाऱ्या माणसांशी शोधून शोधून संपर्क ठेवला जातो. एरवी कधी न झुकणारी मान अतिशय अदबीने झुकायला लागते. रस्ते, नळपाणी योजना, समाज मंदिर, पाखाड्या यांची यादी आपुलकीने पाहिली जाते. उद्घाटनांचा वेग वाढतो. न दिसणाऱ्या नेत्याला चक्क भेटायलाही मिळते. निवडणुका आल्यावर हे चित्र सगळीकडे दिसते. या साऱ्याबरोबरच आणखी एक चित्र प्राधान्याने दिसते, ते म्हणजे पक्षांतर... आत-बाहेर नावाचा हा नाट्यप्रयोग निवडणुकीच्या रंगमंचावर रंगायला लागतो. एका पक्षाच्या दारातून बाहेर, दुसऱ्या पक्षाच्या दारातून आत... पाच वर्षात एरवी अपवादानेच दिसणाऱ्या या नाटकाचे निवडणुका आल्यावर मात्र रोजच प्रयोग पाहायला मिळतात. हे फक्त देश आणि राज्य स्तरावरच घडते, अशातला भाग नाही. जिल्हा आणि गाव पातळीवरही घडते. आताच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील या नाटकाचा एका अंकाचा प्रयोग सध्या हाऊसफुल्ल गर्दीत सुरू आहे.गेल्या काही दिवसात सर्वच आमदारांनी भूमिपूजने आणि उद्घाटनांचा सपाटाच लावला आहे. विविध प्रकारच्या विकासकामांची चर्चा वाढू लागली आहे. आता सर्वच पक्षांनी आपली दारे सताड उघडी केली आहेत. त्यानुसार नाराज, असंतुष्टांनी कुठे ना कुठे प्रवेश सुरू केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात ‘आत-बाहेर’चा प्रयोग धुमधडाक्यात सुरू झाला आहे.शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसवासी झालेले माजी आमदार गणपत कदम आणि सुभाष बने यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनीही परतीचा मार्ग धरला आहे. हे कार्यकर्ते कधी आमचे नव्हतेच, काही दिवस आले होते, आता परत गेले, असा दावा काँग्रेसकडून केला जात असला तरी कुठल्याही नेत्याच्या, पदाधिकाऱ्याच्या, कार्यकर्त्याच्या जाण्याने फरक पडतोच. राजापूर तालुक्यात गणपत कदम शिवबंधनात बांधले गेले, तर याच तालुक्यातील राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांनी भारतीय जनता पार्टीची वाट धरली आहे. तुळसणकर यांचा राजकीय प्रभाव मोठा नसला तरी सामाजिक क्षेत्रात त्यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांचा संपर्क चांगला आहे.संगमेश्वर तालुक्यातील माजी आमदार सुभाष बने यांनीही शिवबंधन स्वीकारले आहे. पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी वेगवेगळी पदे भूषवताना त्यांनी मोठा संपर्क निर्माण केला होता. मध्यंतरीच्या काळात ते मुख्य प्रवाहातून काहीसे बाजूलाच गेले होते. कदाचित म्हणूनच त्यांनी शिवसेनेत परत जाण्याचा मार्ग स्वीकारला असावा. त्यांच्याबरोबरही त्यांचे काही सहकारी आहेत. सध्या तांत्रिक कारणांमुळे त्यांनी काँग्रेस सोडली नसली तरी ते मनाने शिवसेनेत पोहोचले आहेत.रत्नागिरीत आता मोठी चर्चा आहे ती रवींद्र माने यांची. १९९0 सालापासून ते राजकारणात पुढे आले. पहिल्याच निवडणुकीत आमदार झाले. मात्र, शिवसेनेने त्यांची उमेदवारी सुभाष बने यांना दिल्यानंतर ते काहीसे नाराज झाले. त्यानंतर काही काळात त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता ते राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपच्या वाटेवर असल्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणातील पुलांच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी जेव्हा रत्नागिरीत आले, तेव्हा महामार्गावरच एका ठिकाणी रवींद्र माने यांनी त्यांची भेट घेतली. रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी या दोघांची भेट घडवून आणली. रवींद्र माने वाटेत थांबले आहेत, हे बाळ माने यांना माहीत होते आणि त्यांनी त्याची कल्पना देत गडकरी यांच्याशी भेट घडवून आणली. ही भेट केवळ आपल्या भागात आलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या स्वागताची नव्हती. या दोघांनीही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकत्र काम केले आहे. त्यामुळे या भेटीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. संगमेश्वर तालुक्यातील रवींद्र माने आणि सुभाष बने हे दोन नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले तर या तालुक्यातील युतीची ताकद अधिक मजबूत होईल, हे नक्की आहे.रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिक आणि काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले महेंद्र जैन, टी. जी. शेट्ये, रत्नागिरीचे माजी उपनगराध्यक्ष बाबा ढोल्ये यांनीही काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष हटाव मोहीम राबवणाऱ्या लोकांपैकी काहीजण भास्कर जाधव यांच्या संपर्कात असून, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत.लोकसभेत भाजप आणि शिवसेनेला मिळालेल्या मोठ्या विजयामुळे विधानसभा निवडणुकीतही ही युती काहीतरी करिश्मा दाखवेल, अशी अटकळ बांधून सध्या या दोन पक्षांकडे वळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे पक्षांतर चायनीज वस्तूंसारखे आहे. ते किती काळासाठी असेल, ही माणसे आता कायम तिथेच राहतील का, याची कसलीच गॅरेंटी नाही.निवडणुका होईपर्यंत हे पक्षांतर नाट्य सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट आहे. अजूनही अनेक कलाकारांचा या नाटकातील प्रवेश बाकी आहे. येत्या काही दिवसातच हे फरक झालेले दिसतील. आपल्या बाजूचे वातावरण निर्माण करण्यासाठी काही माणसांचे प्रवेश घडवून आणले जातील. आताच्या काळात राजकारण पूर्णपणे बदलून गेले आहे. ध्येय-धोरणे आणि निष्ठा संपल्या आहेत. आता उरला आहे तो पदांपुरता स्वार्थ. त्यातूनच राजकारण बदलत जात आहे. अर्थात ही माणसे कोणी वेगळी नाहीत, तुमच्याआमच्यातूनच तयार झाली आहेत. यथा राजा तथा प्रजा, हे पूर्वीचे वाक्य आता यथा प्रजा तथा राजा असे म्हणायची वेळ आहे. जसे लोक आहेत, तसा त्यांना राजा मिळतो, ही बाब आता मान्य करायलाच हवी. लोक केवळ स्वच्छ राजकारणाची अपेक्षा करतात आणि मतदानाला जातही नाहीत. त्यामुळे वन टू का फोर करणारे राजकारणी आपल्या वेगवेगळ्या बळांवर विजयी होतात आणि राजकारण कधी स्वच्छ होतच नाही. जोपर्यंत सर्वसामान्य माणूस पुढाकार घेत नाही, तोपर्यंत राजकारणातले हे नाटक असेच सुरू राहील... कधी आत कधी बाहेर.
एक अंकी नाटक आत-बाहेर
By admin | Published: September 05, 2014 10:38 PM