चिपळूण : कृषीदिनाच्या पार्श्वभूमीवर २१ जून ते १ जुलैदरम्यान ही मोहीम राबविण्यात येईल. याच कालावधीत पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ‘एक कुटुंब, एक वृक्ष’ हा कार्यक्रम मोहीम स्वरुपात राबविण्याचा निर्णय पंचायत समितीने घेतलेला आहे. त्यामुळे सरपंचांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एकूण कुटुंबांची संख्या विचारात घेऊन ‘एक कुटुंब, एक वृक्ष’ मोहीम राबवावी, असे आवाहन पंचायत समितीतर्फे सभापती, उपसभापती व गटविकास अधिकारी यांनी केले आहे.
ग्रामपंचायत स्तरावर पर्यावरणविषयक जागृती करण्याच्यादृष्टीने कुटुंबांचा सहभाग घेऊन त्यांच्याकडून किमान एक रोप लावून त्यांना संगोपनाची जबाबदारी देण्यात यावी, तसेच कुटुंबाकडे जागा उपलब्ध नसल्यास सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करावी. लागवडीसाठी प्राधान्याने आंबा, काजू, नारळ, कोकम, फणस, जांभूळ, आवळा आदी फळझाडे तसेच वड, पिंपळ, करंज, नीव यासारखे उंच व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करावी, अशी सूचना तालुक्यातील ग्रामपंचायतींना करण्यात आली आहे. याकरिता येणाऱ्या खर्चाची तरतूद लोकसहभागातून किंवा ग्रामनिधीतून करण्यात यावी. लागवडीसंबंधित तांत्रिक मार्गदर्शन पंचायत समितीचा कृषी विभाग करणार आहे. प्रत्येक गावात, कुटुंबांनी एक वृक्ष लावून त्याचे जतन करावे, असे आवाहन सभापती रिया कांबळे, उपसभापती प्रताप शिंदे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी केले आहे.