विनोद पवारराजापूर : गावागावांतील स्मशानभूमींची डागडुजी होण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येत असली तरी त्या स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसेल तर? नदीपात्रातून मृतदेह खांद्यावर घेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ सागवे-वडपवाडी (ता. राजापूर) येथील ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे. येथील ग्रामस्थांना नदीपात्रातून पायपीट करीत चिंचाेळ्या रस्त्यावरून मृतदेह घेऊन कसरत करीत जावे लागत आहे.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची वेस ओलांडत असतानाच ग्रामीण भागात आजही पायाभूत सुविधाच नसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. राजापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील सागवे, वडपवाडी भागात रस्ताच नसल्याने तेथील जनतेला स्मशानात मृतदेह घेऊन जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता बनविण्यात आलेला नाही.
सागवे हा तालुक्यातील मोठा परिसर आहे. यामध्ये वडपवाडी पोस्ट सागवे हे गाव सामाविष्ट आहे. या गावची स्मशानभूमी गावाबाहेर असून, तिथपर्यंत जाण्यासाठी आजही पक्का रस्ता. स्मशानभूमीकडे एखादा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न्यायचा असेल तर बाजूला असलेल्या नदीच्या पात्रातून चालत किंवा होडीच्या साहाय्याने जावे लागते. दाेन दिवसांपूर्वी गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांना नदीपात्रातून वाट काढत जावे लागले.ही सतावणारी समस्या कायमची दूर व्हावी म्हणून वडपवाडीतील ग्रामस्थांनी शासनस्तरावर सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. मात्र, रस्ता काही मार्गी लागलेला नाही. लाेकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.