राजापूर : कोरोनामुळे शासकीय कार्यालयात १५ टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश असताना राजापूर पंचायत समितीत १०० टक्के उपस्थितीची सूचना निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. १५ टक्के उपस्थितीच्या सूचना असताना ५० टक्के उपस्थिती दर्शवत होते. त्यातच सोमवारपासून सर्व कर्मचाऱ्यांना नियमित उपस्थित राहण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
मोबाइल सेवा ठप्प
राजापूर : तौउते चक्रीवादळामुळे राजापूर तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाला. शिवाय विविध मोबाइल कंपन्यांचे टॉवरही बंद पडले आहेत. महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीसाठी परिश्रम घेत आहेत; परंतु मोबाइल नेटवर्कअभावी अनेक गावांचा संपर्क मात्र तुटला आहे.
मिश्रपीक लागवड प्रयोग
रत्नागिरी : तालुक्यातील खानू येथील शेतकरी संदीप कांबळे यांनी ज्वारी, कुळी व मेथी पिकाची मिश्र पद्धतीने लागवड करून तिन्ही पिकांचे उत्पादन घेतले आहे. वाफा पद्धतीने ज्वारी व दोन्ही बाजूंना सरीमध्ये कुळीथ व शिल्लक क्षेत्रावर मेथी लागवड केली होती. प्रायोगिक तत्त्वावरील मिश्रपीक लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
कोचुवेली गाडी रद्द
रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने साप्ताहिक स्पेशल कोचुवेली एलटीटी गाडी रद्द केली आहे. कोकण मार्गावरून धावणारी कोचुवेली लोकमान्य टिळक टर्मिनस २० मे ते ३० मेअखेर येता- जाता बंद राहणार आहे. याशिवाय अन्य स्पेशल सहा गाड्या रद्द करण्यात आल्या.
पाणीपुरवठा पूर्ववत
रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणावरचा वीजपुरवठा गेले दोन दिवस खंडित आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित न होता धरणावर बसविण्यात आलेल्या नवीन जनरेटरमुळे सुरळीत सुरू होता. तीन विद्युत पंप व नवीन जनरेटर यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाई जाणवली नाही.