रत्नागिरी : एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३६ कोटी ७९ लाखांचा कृती आराखडा राबविण्यात येऊन शंभर टक्के कामांची पूर्तता झाली आहे. शहरातील विद्युत वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी या योजनेंतर्गत राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली शहरांची निवड करण्यात आली होती.
एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत रत्नागिरी शहरासाठी ६ कोटी ३९ लाख, राजापूरसाठी ३ कोटी २२ लाख, चिपळूण शहरासाठी ७ कोटी ९ लाख, खेडसाठी १० लाख ५६ हजार, दापोली शहरात ७ कोटी ५ लाखांच्या मंजूर निधीतून विविध कामे करण्यात आली आहेत.
या योजनेंतर्गत एकूण ३३ केव्ही वाहिनी नऊ किलोमीटर, लघुदाब वाहिनी आठ किलोमीटर तर भूमिगत वाहिनीचे ५१.५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी झाडगाव उपकेंद्रात अतिरिक्त पाच एमव्हीए रोहित्र बसविण्यात आले आहे. राजापूर १ उपकेंद्रामध्ये रोहित्र क्षमता वाढीसाठी पाचऐवजी दहा एमव्हीएचे रोहित्र बसवून ते सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण ७९ नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये १०० केव्हीच्या ६३ ट्रान्सफार्मरचा समावेश आहे. ११९ ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविण्यात आली आहे. गर्दीच्या तसेच दाटीवाटीच्या वस्ती ठिकाणी स्पार्किंग किंवा अन्य अपघात होऊ नयेत, यासाठी खबरदारी म्हणून एअर बंच केबल बसविण्यात आली आहे.
--------------------------
लघुदाबाचे ३६९ तर उच्चदाब वाहिनीचे २१२ वीजखांब बदलण्यात आले आहेत. याशिवाय उच्चदाब वाहिनीच्या १०० खांबांवर व लघुदाब वाहिनीच्या १६१ खांबांवर गार्डीन बसविण्यात आले आहेत. १५३ आयस्यूलेटर बदलण्यात आले आहेत.
---------------------------
चिपळूण शहरात एकूण २२ रोहित्र बसविण्यात आली असून, त्यामध्ये १०० केव्हीची १७ तर २०० केव्हीच्या ५ रोहित्रांचा समावेश आहे. राजापूरमध्ये १०० केव्हीची दहा रोहित्र बसविण्यात आली आहेत. खेडमध्ये १०० केव्हीची ३ व दोनशे केव्हीची २ रोहित्र तर दापोलीमध्ये शंभर केव्हीची २३ व २०० केव्हीची दहा रोहित्र बसवली आहेत. जिल्ह्यातील एकूण ८३ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात आली असून, त्यामध्ये रत्नागिरीत ११, चिपळुणात २७, राजापूर ३, खेड १४, दापोलीतील २८ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात भूमिगत वाहिन्यांतर्गत ५१.५ किलोमीटरपर्यंत उच्चदाब वाहिनी बसविण्यात आली आहे. खेड, राजापूरमध्ये भूमिगत वाहिनींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
-------------------------
एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत विविध कामांची पूर्तता करण्यात आली आहे. विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी वाढवलेली ट्रान्स्फार्मरची क्षमता फायदेशीर ठरत आहे. लघुदाब, उच्चदाब तसेच भूमिगत वाहिन्यांमुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी झाले असून, ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होत आहे. शिवाय कमी, अपुऱ्या दाबाने हाेणाऱ्या वीज पुरवठ्याच्या तक्रारीही कमी झाल्या आहेत.
- देवेंद्र सायनेकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडळ.