राजापूर : महापुराने हाहाकार उडविलेल्या चिपळूण, खेड भागात साथीचे व अन्य रोग पसरण्याची भीती असल्याने, तेथे प्राधान्याने कोविडचे शंभर टक्के लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार व काँग्रेस नेत्या हुस्नबानू खलिफे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पूरग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्यासह अन्नधान्याची किट्स घेऊन हुस्नबानू खलिफे व नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांनी पूरग्रस्त भागात भेटी दिल्या.
खेडमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेले आपल्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. पूर आलेल्या सर्वच भागात अद्याप चिखलाचे मोठे साम्राज्य असून, पावसामुळे हा चिखल सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करणे अत्यावश्यक असल्याकडे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. महापुरानंतर रोगराईचा मोठा धोका असल्याने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात पूरपीडितांना प्राधान्य देण्याची त्यांनी गरज व्यक्त केली.
चिपळूण, खेडमध्ये महापुराने होत्याचे नव्हते झाले आहे. अनेक घरे, त्यातील साहित्य, वाहने यांचे शंभर टक्के नुकसान झाले असल्याने पंचनामे करत न बसता, पूरग्रस्तांना उभे राहण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्यात यावी, अशी मागणी खलिफे यांनी केली. कोकणातील दरवर्षीचे पूर व त्यामुळे निर्माण होणारी भयावह स्थिती नियंत्रणात आणायची असेल तर नद्यांमधील गाळ उपसणे अत्यावश्यक आहे. यासाठी जिल्हास्तरावर तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात यावी, या समितीद्वारे पूर नियंत्रणाच्या उपाययोजनांची आखणी व्हावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचेही त्या म्हणाल्या.