लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. जिल्ह्यातील एक लाख १३ हजार १५३ विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३० हजार ८८३ पाठ्यपुस्तकांची मागणी शिक्षण विभागाकडून ‘ बालभारती’कडे करण्यात आली होती. मात्र, अद्याप पाठ्यपुस्तके प्राप्त न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्याच पुस्तकांद्वारे अध्यापन करावे लागत आहे.
शिक्षकांनी गतवर्षीच्या विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके गोळा करून मुलांना वितरित केली आहेत. ऑनलाईन अध्यापनामुळे विद्यार्थी जुनीच पुस्तके वापरत आहेत. गेले दीड वर्षे कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. ५५ टक्के विद्यार्थी ऑनलाईन अध्यापन करत असले तरी ४५ टक्के विद्यार्थी अद्याप ऑफलाईन आहेत.
शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत शासकीय मराठी आणि ऊर्दू शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३० हजार ८८३ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, नवीन पुस्तके अद्याप उपलब्ध होत नसल्याने जुन्याच पुस्तकांचाच आधार घ्यावा लागत आहे. ऑफलाईन अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय पुस्तिका शिक्षकांनी झेरॉक्स काढून वितरीत केल्या आहेत. मुले दैनंदिन स्वाध्याय पुस्तिका सोडवून आठवड्याला वह्या शिक्षकांना सादर करत आहेत. शिक्षकही मुलांना स्वाध्याय पुस्तिका तपासून देत आहेत.
-----------------------
तालुका विद्यार्थी पुस्तकसंख्या
मंडणगड ४८१० २६,६०२
दापोली १२०५२ ६७०६४
खेड ११०३९ ३१७८३
चिपळूण १८२६७ १०१५४६
गुहागर ९५८४ ५१८७७
संगमेश्वर १३०८३ ७३५३४
रत्नागिरी २३९०१ १३३६५७
लांजा ८३७२ ४५५२३
राजापूर १२०४५ ६५३१७
एकूण ११३,१५३ ६३०८८३