आॅनलाईन लोकमतखेड (जि. रत्नागिरी), दि. १५ : तळे - चंदनवाडी येथील बंद घरात जिलेटीनच्या कांड्या व बंदूक आढळल्याप्रकरणी फरारी असलेला संशयित आरोपी सीताराम रामचंद्र बाईत याला मुंबई येथून नाट्यमयरित्या पकडल्यानंतर त्याचा साथीदार नितीन काशिराम शिंदे (तळे - चंदनवाडी) याला पोलिसांनी अटक केली.माझ्या घरात आढळलेली ठासनीची बंदूक आपली नसून ती नितीन शिंदे यांची असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी नितीन शिंदे याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. या दोघांना खेड येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.सीताराम बाईत यांच्या बंद घरात ठासनीची बंदूक, जिलेटीनच्या कांड्या व स्फोटकसदृश इतर साहित्य आढळले होते. खेडचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत ही कारवाई केली होती. यावेळी अंधाराचा फायदा घेत सीताराम बाईत नजीकच्या जंगलात पळाला होता. दोन महिन्यानंतर खेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व गुन्ह्याचे तपासिक अधिकारी चंद्रकांत लाड यांनी मुंबईतील एका कंपनीच्या गेटवरच सोमवारी ११ जुलै रोजी बाईत याच्या मुसक्या आवळल्या. खेड येथील न्यायालयात हजर केले असता त्याला १ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. मंगळवारी पोलिसांनी पुन्हा कोठडीची मुदत मागितली होती. ती न्यायालयाने मान्य करुन एक दिवस आणखी कोठडी वाढवण्यात आली.यावेळी अटकेत असलेल्या आरोपी सिताराम बाईत याची चौकशी करण्यात आली. या चौकशीत सिताराम याने घरात आढळलेली बंदूक नितीन शिंदे याची असून त्याने ती आपल्या घरात ठेवण्यास सांगितली होती. याबाबत नितीन शिंदे यानेही ती बंदूक आपणच ठेवल्याची कबुलीही दिली आहे.महाशिवरात्रीच्या दिवशी महिपतगडावरील शंकराचे दर्शन घेऊन परतत असताना हे काम केल्याचे बाईत याने पोलिसांना सांगितले. या स्फोटक साहित्याचा वापर मासेमारीसाठी होत असल्याची माहिती खेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी दिली.दुसरा संशयित आरोपी नितीन शिंदे यानेच आपल्याकडील बंदूक बाईत याच्या बंद घरामध्ये ठेवली होती. बंदूकदेखील विनापरवाना असून, ती नितीन शिंदे याच्या मालकीची नसून, ती कोठून आणली याचा तपास आता पोलीस करत आहेत. खेडचे पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड तपास करत आहेत.
जिलेटीन बाळगल्याप्रकरणी आणखी एकास अटक
By admin | Published: July 15, 2017 2:41 PM