चिपळूण : शहरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी गजबजलेली वस्ती असलेल्या रॉयलनगर परिसरात तब्बल १३ सदनिका, तर पाग उघडा मारुती परिसरातील दोन बंगलेही फोडले. काही ठिकाणी रोख रक्कम व दागिने चोरट्यांनी लंपास केले, तर काही ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. चोरट्यांनी रॉयलनगर आणि पाग येथून दोन दुचाकीही पळवून नेल्या आहेत.पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी तातडीने धाव घेऊन पाहणी करत माहिती घेतली. शहरातील रॉयलनगर परिसरातील त्रिमूर्ती अपार्टमेंटच्या सी विंगमधील संतोष मोहिते यांच्या बंद फ्लॅटची कडी गॅस कटरने तोडून चोरटे आत शिरले. कपाटातील सामान इतरत्र फेकून दागिन्यांचे डबे उघडून, त्यामधून सोन्याची अंगठी, तसेच सोन्याचे रिंग आणि ५,००० रुपयांची रोकड घेत पोबारा केला.मोहिते हे नगर परिषद कर्मचारी असून, संध्याकाळीच ते आपल्या मोरवणे या गावी गेले होते. बाजूलाच असलेला सुनील जाधव यांचा फ्लॅटही असाच फोडण्यात आला. मात्र, चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. समोरच त्रिमूर्ती अपार्टमेंट ए विंग आहे.
या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील जैनब्बी लियाकत नेवरेकर यांचा बंद फ्लॅटही चोरट्यांनी फोडला. या ठिकाणी बेडरूममधील कपाट उघडून नासधूस करण्यात आली. मात्र, येथेही चोरट्यांना काहीच मिळाले नाही. नेवरेकर हे संगमेश्वर येथील कळंबस्ते येथे राहतात. त्यामुळे त्यांचा फ्लॅट नेहमी बंदच असतो. याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शैलेंद्र तांबे यांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी पाहणी केली. मात्र, येथे काहीच नव्हते.याच भागात सदिच्छा अपार्टमेंट येथील अरविंद कदम, अली खान यांचा फ्लॅटही फोडण्यात आला. त्यात चोरट्यांची निराशा झाली. याच इमारतीच्या पार्किंगमधील प्रवीण ठसाळे यांची दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले.अंथरूणही चोरलेमुंबई-गोवा महामार्गावरच्या पाग परिसरात चोरट्यांनी चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष जाधव यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा फोडून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. येथील अंथरूण व काही कपडे घेऊन चोरटे पसार झाले. सुभाष जाधव व त्यांचे कुटुंब वरच्या मजल्यावर होते, परंतु त्यांना थांगपत्ता लागला नाही.दुचाकी घेऊन पोबारापाग येथील उदय चितळे यांच्या रायगड बंगल्याच्या पार्किंगमधील दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले. कार पळविण्याचा प्रयत्नही चोरट्यांनी केला. मात्र, तो असफल झाला. चोरी करण्यासाठी फ्लॅट आणि बंगल्याचे दर्शनी दरवाजाच्या कडी तोडताना चोरट्यांनी सर्वत्र एकच पद्धत वापरली असल्याने ही टोळी असल्याचा अंदाज आहे.