मंडणगड : ‘एक धाव निसर्गासाठी’ नंतर आता ‘एक धाव आरोग्यासाठी’ अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन ‘ब्लू ग्रीन एक्सॉटिका’ व ‘गोकी’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २४ नोहेंबर रोजी तालुक्यात करण्यात आले आहे.
कोंझर येथील ब्ल्यू ग्रीन एक्सॉटिका येथून सुरू होणारी ही सफर मंडणगड किल्ला, पाले, पणदेरी, पेवे, टाकवली, अडखळमार्गे कोंझर येथे संपणार आहे. तालुक्यातील दुर्गम भागातून जुन्या पायवाटांना जागरूक करून या ५० किलोमीटर ‘जंगल वॉक’चे आयोजन केले आहे. यासाठी गावागावातील जुन्या पायवाटा शोधून त्या साफ करून चालण्यासाठी योग्य करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ ‘ब्ल्यू ग्रीन एक्सॉटिका व गोकी टेक्नॉलॉजी, मुंबई व मंडणगड नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मंडणगड तालुक्याचा पर्यटन विकास व स्थानिकांना रोजगाराचे ध्येय नजरेसमोर ठेवून ‘महाभ्रमण योजना’ या संकल्पनेतून या ५० किलोमीटर जंगल वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील पर्यटनाला चालना देण्याबरोबरच आरोग्याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, ग्रीनसोल, स्फुर्ती, अबाईडर्स बाईअर्स फाऊंडेशन व अर्पण या सामाजिक संस्थांच्या सहभागाने हा कार्यक्रम होत असल्याची माहिती ब्लू ग्रीन एक्सॉटिकाचे संचालक अवधूत मोरे यांनी दिली आहे.
मुंबई, पुणे यासारख्या शहरांतून शंभरहून अधिक प्रशिक्षित धावपटू यात सहभागी होणार आहेत. सकाळी पाच वाजता सुरू होणाºया या पन्नास किलोमीटर चालण्याची समाप्ती दहा तासाच्या आत करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यासाठी मंडणगड किल्ला, पाले, पणदेरी, पेवे, व टाकवली या पाचठिकाणी चेक पॉर्इंट उभारण्यात आले आहेत. याठिकाणी धावपटूंना नाश्ता, जेवण, आराम, प्रथमोपचार यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी एक ‘कव्हरींग टीम’ नेमण्यात आली आहे. गेले दोन महिने याची तयारी सुरू असून, पन्नास किलोमीटरच्या पाऊलवाटा तयार करण्यासाठी पाच गावातील सुमारे शंभर स्थानिक स्त्री-पुरुष, आदिवासी बांधव पायवाटांच्या साफसफाईचे काम करत आहेत. त्यामुळे स्थानिक जनतेलाही रोजगार मिळाला आहे.
यानिमित्ताने बाहेरील पर्यटक मंडणगडमध्ये येणार आहेत. या ‘वॉक’च्या निमित्ताने तालुक्यातील विशेषत: कोकणातील निसर्ग व त्यावर आधारीत ग्रामीण लोकजीवन, संस्कृती याची जगाला ओळख होणार आहे. त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.
पुस्तके, वस्तूंचे वाटप
जलपर्यटन, गिरीभ्रमंती, अन्नपुरवठा याची स्थानिकांना माहिती झाल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. ज्या गावांमधून या ‘वॉक’चा ट्रॅक असणार आहे, त्या गावातील शाळा, ग्रंथालय यांना पुस्तके, शालोपयोगी वस्तू, गणवेशाचे वाटप करण्याचे आयोजकांचे नियोजन आहे.