रत्नागिरी : पुढील गाडीला ओव्हरटेक करुन जाणाऱ्या शेरोले कारची एसटीला समोरून जोरदार धडक बसली. यावेळी एसटी चालकाने कारला वाचविण्यासाठी गाडी उजव्या बाजूला घेतली. मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी आयटेन गाडीला धडक देत समोरील साईमंगल कार्यालयात घुसली. एसटी चालकाने प्रसंगवधान दाखविल्याने रस्त्यावरील दुचाकी स्वार अपघातापासून बचावले. मंगळवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास जे के फाईल्स जवळ हा अपघात झाला.लांजा डेपोची रत्नागिरी - लांजा गाडी घेऊन चालक रात्री दहा वाजता रत्नागिरी बसस्थानकातून बाहेर पडला होता. रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास साळवी स्टॉप येथील प्रवासी घेऊन चालक एलजी शोरूमच्या येथून पुढे जात असताना समोरील गाडीला ओव्हरटेक करुन पुढे आलेल्या शेरोलो कारने एसटीला जोरदार धडक दिली. मात्र याच कालवधीत शेरोलो कारला विचविण्यासाठी एसटी चालकाने गाडी उजव्या बाजूला घेतली.
मात्र त्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी आयटेन कारला धडक देत सरळ साई मंगल कार्यालयात घुसली. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकी चालकांना वाचविण्याचा प्रयत्न एसटी चालकाने केला.या अपघातात शेरोले कार मधील विजय लिंगायत गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत गाडीमध्ये अडकले होते.यावेळी या मार्गावरुन जाणारे सुनील सकपाळ, ऋषी तळेकर यांनी त्यांना गाडीतून बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात हलविले.तर आयटेन कारमध्ये प्रभात भालेकर आपल्या पत्नी , मुले आईसह साळवी स्टॉपच्या दिशेने जात असताना त्यांना एसटीची धडक बसली. या अपघातातून भालेकर कुटुंबिय सुखरुप बचावले आहे. रात्री उशीरा पर्यंत शहर पोलीस अपघाताचा पंचनामा करीत होते.