रत्नागिरी : रत्नागिरीजवळील उद्यमनगर एमआयडिसीमध्ये पिस्तुलाने पाठीमागून डोक्यात गोळी मारून आनंद बलभीम क्षेत्री (३५, झाडगाव एमआयडीसी, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीजवळ, रत्नागिरी) याचा खून करण्यात आला होता. रविवारी रात्री १० वाजता घडलेल्या या खूनप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपी किरण मल्लिकार्जून पंचकट्टी (२२, गुलबर्गा, कर्नाटक) या आरोपीला अटक केली आहे. आरोपी व मयत हे दोघे चुलत भाऊ आहेत. याबाबतची माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत माहिती देताना डॉ. मुंढे म्हणाले, आनंद क्षेत्री याचा खून आर्थिक देवाण-घेवाणीतून झाला आहे. आरोपी किरणचे आनंदशी ४ जानेवारीला भांडण झाले होते. आनंदने त्याच्याकडून गाडीसाठी ३ लाखांपेक्षा अधिक रक्कम घेतली होती. ती परत देण्यावरून हा वाद झाला होता. त्यावेळी आनंद याने किरणला मारहाणही केली होती. या वादाचा बदला किरण पंचकट्टी याने चुलत-चुलत भाऊ असे नाते असलेल्या आनंद क्षेत्रीचा खून करून घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र खुनामागे आणखी काही कारण आहे काय, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे.
रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर आनंद आणि त्याचे मित्र आनंदच्या गाडीत बसून घरी निघाले होते. आनंद हा गाडी चालवत होता. त्याचवेळी गाडीत मागे बसलेल्या मित्रांपैकी किरण पंचकट्टी याने पुढे बसलेल्या आनंद क्षेत्रीच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडली. गोळी वर्मी बसताच आनंद याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी नजीकच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली. ही धडक एवढी जोरदार होती की संरक्षक भिंत कोसळून त्याशेजारील लोखंडी गेटही कोसळले.
दरम्यान, क्षेत्री याला त्याच्याच एका मित्राने उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले तर अन्य मित्र पसार झाले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. याबाबत मृत आनंद याचा भाऊ दत्तात्रय बलभीम क्षेत्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम ३०२, भारतीय हत्यार कायदा कलम ३,४/२५, ५/२७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिरिष सासने, रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेश कदम यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर गुन्हा अन्वेषण विभाग, रत्नागिरी ग्रामीण व शहर पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी याप्रकरणी तपास करून २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.महत्वाचेआरोपी किरण पंचकट्टी हा गुलबर्गा कर्नाटकमध्ये गुन्हा करून एप्रिल २०१८ पासून फरार आहे.-गुलबर्गा येथे किरण याच्यावर ३०२ भारतीय दंडविधानाअंतर्गत गुन्हा दाखल आहे.-गेल्या सहा महिन्यांपासून किरण हा खून केलेल्या आनंद क्षेत्री याच्या घरी राहत होता.- शासनच्या मुद्रा योजनेतून घेतलेल्या कर्जातील रक्कम किरणने आनंदला दिल्याची शक्यता व्यक्त होत आहे.-आरोपी किरणने आनंदचा खून करायचे आधीच ठरविले होते, असे तपासात निष्पन्न झाले.-गोळीबारासाठी वापरलेले पिस्तूल हे मृत आनंद याचेच असल्याचा अंदाज आहे.-मृत आनंद क्षेत्रीचा व्याजी रक्कम देण्याचा धंदा असल्याचे दिसून आले.- गोळीबार झालेल्या गाडीचे झाडावर आदळून मोठे नुकसान झाले.राम सावंत खुनाचाही तपास सुरूचिपळुणमधील रामदास सावंत खूनप्रकरणीही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. त्याप्रकरणातही पोलीस आरोपीला नक्की पकडतील. त्या खुनामागे प्रॉपर्टी, पैशांची देवाण-घेवाण व अन्य काही कारणांची चर्चा आहे. पोलीस आरोपीपर्यंत नक्कीच पोहोचतील, असा विश्वास पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी व्यक्त केला.