चिपळूण : मदत वाटपाचे फोटो काढल्याचा राग येऊन सहा जणांनी एका व्यक्तीस बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना शहरातील काविळतळी येथील जिव्हाळा बाजार रोझी अपार्टमेंट परिसरात २५ जुलैला रात्री घडली. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादिक अब्दुलरेहमान नायकोडी (५०, रा. कडवई, ता. संगमेश्वर) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरून इक्बाल शमशुद्दीन काझी, शाहीद इक्बाल काझी, अशीर शाहीद काझी व अन्य अनोळखी तीन व्यक्तींवर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक नायकोडी हे आपल्या उमलती पृथ्वी संस्था मुंबई या संस्थेच्या सदस्यांसह शहरातील काविळतळी येथील पूरग्रस्तांना मदत वाटपाचे काम करीत होते. या वेळी त्यातील इरफान अमिरुद्दीन वलगे याने अशीर काझी यांचा फोटो काढला. याचा राग येऊन इक्बाल काझी, शाहीद काझी, अशीर काझी आणि अनोळखी तीन अशा सहा जणांनी सादिक नायकोडी यांना शिवीगाळ केली. ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाकडी दांडक्याने मारहाण मारून जखमी केले. २५ जुलैच्या या घटनेबाबत बुधवार १८ रोजी तक्रार देण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.