लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : तालुक्यातील ओणी येथे उभारण्यात आलेल्या सुसज्ज कोविड हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा रविवार, दिनांक ३० मे २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
या लाेकार्पण साेहळ्याला खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले - गावडे, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. संजय शिंदे यांची उपस्थित राहणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयावरील वाढता ताण पाहता तसेच रुग्णांना रुग्णवाहिकेमधून रत्नागिरी येथे नेण्याची परवड थांबण्यासाठी आमदार राजन साळवी यांनी ओणी येथे कोविड हॉस्पिटल उभारण्याची मागणी केली हाेती. त्यानुषंगाने आमदार राजन साळवी यांनी आमदार स्थानिक निधी कार्यक्रमांतर्गत कोविड - १९ वैद्यकीय यंत्र सामुग्री व साहित्य खरेदीसाठी ९१ लाख रुपये इतका निधी मंजूर केला हाेता. हे काेविड हाॅस्पिटल उभारणीसाठी अपर जिल्हाधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी केलेल्या सहकार्यामुळे ओणी येथील परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये ३० बेडचे हॉस्पिटल सुरू करणात येणार आहे. त्यामध्ये २५ ऑक्सिजन बेड व ५ आय. सी. यु. बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच रायपाटण कोविड केअर सेंटरचा लोकार्पण सोहळा सायंकाळी ४.३० वाजता आमदार राजन साळवी यांच्या हस्ते व प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तेथे ४५ बेडचे सुसज्ज हॉस्पिटल सुरू करणात येणार आहे. त्यामुळे कोविड रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.