भाजीपाला, फळांच्या मागणीत वाढ, आवक घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये भाजीपाला, फळांची आवक कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच मुंबईतून होत आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाला, फळांची आवक घटली आहे. मात्र, मागणीत वाढ झाली असून दरही कडाडले आहेत. बटाट्याच्या दरात वाढ झाली असून कांद्याचे दर मात्र स्थिर आहेत. कोरोना व रमजान यामुळे फळांना मागणी अधिक होत आहे.
मे महिन्यात साधारणत: साठवणुकीच्या कांद्याची खरेदी सुरू होते. वाळलेला व ओला दोन्ही प्रकारचा कांदा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. १२ ते १५ रुपये दराने कांदा विक्री सुरू आहे. बटाट्याचे दर वधारले असून २५ ते ३० रुपये दराने विक्री सुरू आहे. भाज्या मात्र १५ ते २० रुपये पाव किलो दराने विकण्यात येत आहेत. पालेभाज्यांची जुडी १० ते १५ रुपये दराने विक्री सुरू आहे. ग्रामीण भागातून भाजी व फळे विक्रेते गाड्या घेऊन विक्री व्यवसाय करीत आहेत. कांद्याचे दर आणखी खाली येणे ग्राहकांना अपेक्षित आहे.
सध्या भाजीपाला आवक घटली असल्याने दरात वाढ झाली आहे. १५ ते २० रुपये पाव किलो दराने भाजीपाला विक्री सुरू आहे. दर शंभरीच्या पटीत असल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कडधान्यांच्याही दरात वाढ झाली असल्याने दैनंदिन आहारात भाज्या, कडधान्यांची सांगड कशी घालावी असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे.
अननस मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध असून ३५ ते ४५ रुपये नग दराने अननस विक्री सुरू आहे. कच्चे, पिकलेले अननसाचे दर आकारावर ठरत असून हातगाडी घेऊन विक्रेते विक्रीसाठी फिरत आहेत.
सध्या रमजान मास सुरू असल्याने फळांना वाढती मागणी आहे. अन्य फळांच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांना केळी खरेदीच परवडत आहेत. ४० ते ५० रुपये डझन दराने केळी विक्री सुरू आहे. गावठी केळी ६० ते ८० रुपये डझन दराने विकण्यात येत आहेत.
गेली दोन वर्षे लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात महागाईने उच्चांक गाठला आहे. शासनाचे महागाईवर निर्बंध नसल्याने सर्वसामान्यांपुढे समस्या उभारली आहे.
- ऋतुजा पाटील, गृहिणी
महागाईच्या परिणामामुळे दररोजचा डाळभातच महागला आहे. खाद्यतेलासह डाळी, कडधान्ये, भाजीपाल्याचे दर सतत वाढत असल्याने आर्थिक गणितेच विस्कटली आहेत.
- हेमलता देसाई, गृहिणी