देवरुख : कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी देवरुख डी-कॅड कॉलेजतर्फे खुल्या गटासाठी ऑनलाईन इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनविणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत कलाकारांनी या मूर्ती बनवायच्या आहेत.
स्पर्धेसाठी बनविण्यात येणारी मूर्ती माती किंवा अन्य कोणत्याही पर्यावरणपूरक माध्यमांव्दारे बनविलेली असावी. मूर्तीचा आकार कमीत कमी ८ इंच व जास्तीत जास्त १२ इंच एवढा असावा, मूर्ती न रंगविता तिचे फोटो काढून पाठविणे आवश्यक आहे. फोटो चारही बाजूने घेतलेले असावेत. मूर्ती हातानेच तयार करावयाची आहे. स्पर्धेसाठी फोटोबरोबरच मूर्ती साकारताना वापरल्या जाणाऱ्या चार स्टेपचे फोटो आवश्यक आहेत. यामध्ये बेस रचताना, मूर्ती रचताना, कच्चे फिनिशिंग आणि अंतिम फिनिशिंग असे फोटो काढावेत.
मूर्ती बनवून झाल्यानंतर तिचे फोटो ganesha.decad2021@gmail.com या इमेल वरती पाठवायचे आहेत. स्पर्धेचा निकाल १५ ऑगस्टला जाहीर केला जाणार आहे. या स्पर्धेत अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार व १ हजाराची दोन उत्तेजनार्थ क्रमांक व डिजिटल प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य रणजीत मराठे यांनी केले आहे.