पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे असल्यामुळे शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढतच आहे. विनाअनुदानित तत्वावर शाळा सुरू करण्यात येत असल्यामुळे संस्था इमारत बांधकाम निधीच्या माध्यमातून पालकांकडून अव्वाच्या सव्वा ‘डोनेशन’ वसूल केले जाते. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी संस्थांकडून शाळेचे ‘इन्फ्रा स्ट्रक्चर’ बदलत आहेत. शाळा-शाळांमध्ये स्पर्धा लागल्या असून जो तो आपापल्यापरीने विविध सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या शाळेची पटसंख्या वाढविण्याबरोबर टिकविण्यासाठी संस्थाचे प्रयत्न मात्र वाखाखण्याजोगे आहेत. ग्रामीण भागातील पालकांनाही शहरांचे आकर्षण वाढल्याने ग्रामीण भागातील शाळा ओस पडू लागल्या आहेत. माध्यम कोणतेही असो अध्यापन फार महत्त्वाचे आहे. प्रत्येकाची बौद्धिक क्षमता, बुद्ध्यांक वेगवेगळा असतो. शेजारच्यांशी किंवा नातेवाईकांमध्येच स्पर्धा करत असल्यामुळे अनेकवेळा पालक चुकीचा निर्णय घेतात. प्रतिष्ठेचा प्रश्न समजून विद्यार्थ्यांना महागड्या शाळांमध्ये प्रवेश घेत असतात. शाळेचे इन्फ्रा स्ट्रक्चर उत्कृष्ट असले तरी तेथील अध्यापन करणारा अध्यापकवर्ग याकडे बहुधा दुर्लक्ष होते. इंग्रजी माध्यमाच्या नादात अनेक पालक चुकीचा निर्णय घेऊन नंतर स्वत:लाच दोष देत बसतात. सध्या कोरोनामुळे काही शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करणे सध्या तरी शक्य नाही. गतवर्षी नर्सरी, के.जी. तसेच पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष भरले नाहीत. पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग मात्र टप्प्याटप्प्याने सुरू झाले. विद्यार्थी सुरक्षेमुळे पालक मुलांना शाळेत पाठवणे शक्य नाही शिवाय दीड वर्ष मुले घरात असून त्यांचा वाढता दंगा सुरू असल्याने पालक कंटाळले आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा प्रयत्न करत आहेत. मात्र, सद्य:स्थितीत ऑनलाईनचाच पर्याय योग्य ठरला आहे.
ऑनलाईनचाच पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:41 AM