जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आठवडाभराचा कडक लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. एकूणच विचित्र परिस्थितीत शाळांचे कामकाज दि.१५ जून पासून सुरू झाले, तर अध्यापन मात्र यावर्षीही ऑनलाईनच होण्याची शक्यता आहे. गावा-गावातून कोरोनाने प्रवेश केला असल्याने जिल्हा परिषदेने शाळा ताब्यात घेऊन शाळांमध्येच क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या कमालीची वाढली असून, मृतांची संख्याही वाढतच आहे. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष शाळा व शाळांमधील अध्यापन सुरू करणे अशक्य आहे. त्यामुळे ऑनलाईन हाच उपाय सध्या तरी याेग्य आहे. भौगोलिकदृष्ट्या वाडी-वस्तीवर विखुरलेल्या लोकसंख्येमुळे शाळा असल्या, तरी मोबाईलची रेंज या शाळांमध्ये पोहोचलेली नाही. त्यामुळे या शाळांना ऑनलाईन अध्यापन पध्दतीचा उपयोग नाही. शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना आसपासच्या गावातून ये-ज़ा करावी लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रुग्णसंख्या कमालीची वाढली असल्याने प्रत्यक्ष अध्यापनासाठी पालक किती तयार होतील, याबाबत शंकाच आहे.
जिल्ह्यातील सर्व अनुदानित शाळेतून पाठ्यपुस्तके मोफत देण्यात येत असली, तरी वह्या व अन्य शैक्षणिक साहित्य खरेदी करावेच लागते. नव्या वह्या, पुस्तकांचा गंध नक्कीच मोहित करतो. त्यामुळे शाळेचा कंटाळा करणारे विद्यार्थीही पहिल्या दिवसाची आवर्जून प्रतीक्षा करतात. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या पहिल्यादिवशी नवागताचे स्वागत केले जाते. वाजतगाजत मिरवणूक काढली जाते, पारंपरिक पध्दतीने औक्षण केले जाते. शाळेच्या पोषण आहारात त्यादिवशी चक्क गोड पदार्थांचा बेत आखला जातो. त्यामुळे बालमित्रांनाही शाळेच्या पहिल्या दिवसाची आतुरता लागते. परंतु गतवर्षीपासून कोरोना संकटामुळे शाळेपासून दुरावलेले बालमित्र हिरमुसले आहेत. घरात राहून कंटाळलेल्यांनाही शाळेची ओढ लागली आहे.
शहरातील काही शाळांनी मात्र दहावीचे वर्ग ऑनलाईन पध्दतीने सुरू केले असून, अन्य वर्गही याचपध्दतीने सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी पालकांचे व्हॉटस्ॲप ग्रुप तयार करून त्यावर काही सूचना सुरू केल्या आहेत. ऑनलाईन अध्यापन पध्दतीमुळे वेळेची मर्यादा असल्याने गणित, विज्ञानसारख्या विषयांच्या आकलनावर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र सुरू झाले तरी, प्रत्यक्ष शाळा इतक्यात सुरू होणे अशक्य आहे. गतवर्षीप्रमाणे ऑनलाईनच अध्यापनाचा पर्याय योग्य आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्यादिवशीही मुलांचे प्रत्यक्ष स्वागत न होता ऑनलाईनच होण्याची शक्यता आहे.