महा अभियान कार्यक्रम
लांजा : येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय पोषक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने पोषण परसबाग अभियान, वृक्षारोपण हे उपक्रम आयोजित करण्यात आले. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण या वेळी शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.
जिल्हाध्यक्षपदी मोरे
दापोली : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे कोकण प्रदेश रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदी तालुक्यातील दाभोळ, मोरेवाडी येथील विशाल मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोरे सध्या उन्हवरे विभाग, कुणबी युवा अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. याचबरोबर ओबीसी जनमोर्चा, महाराष्ट्र राज्य कोकण विभाग आदींचेही काम पाहत आहेत.
रस्त्यांची चाळण
दापोली : तालुक्यातील ग्रामीण भागासह आता शहरातील रस्तेही नादुरुस्त झाले असून खड्ड्यांचे संकट कायम आहे. गणेशोत्सवकाळात मुंबई तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या चाकरमान्यांना गणेश दर्शनासाठी कसरत करत यावे लागले. गणेशाचे आगमन आणि विसर्जनही या खड्ड्यातून कष्टप्रद स्थितीत झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
विजेचा लपंडाव सुरुच
लांजा : तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे घरगुती वापराच्या विद्युत उपकरणांमध्ये सातत्याने बिघाड होऊ लागले आहेत. यामुळे वीजग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून नाहक मनस्ताप होत आहे. विद्युतपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.