रत्नागिरी : शैक्षणिक सत्राच्या पारंपरिक मुहूर्तावर १५ जूनपासून शाळा सुरू होत असल्या, तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसल्याने प्रत्यक्ष शाळांऐवजी यंदाही त्या ऑनलाइनच भरणार आहेत. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद, सर्व माध्यमांच्या खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळांची सुरुवात मंगळवारपासून ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून ज्या शिक्षकांना कोरोनाचे शासकीय काम दिले आहे, ते शिक्षक वगळून सर्व शिक्षकांनी दि. १५ जूनपासून पूर्णवेळ शाळेत उपस्थित राहून ऑनलाइन दैनंदिन अध्यापनाचे व शालेय कामकाज करावयाचे आहे. त्यासाठी त्यांनी कोरोना नियमावलींचे पालन करावयाचे आहे. ज्या शाळा कोरोना केअर सेंटर, क्वारंटाइन किंवा आयसोलेशनच्या सुविधेकरिता ताब्यात घेतल्या आहेत, त्या शाळांतील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत लवकरच सूचित करण्यात येणार आहे. परंतु, त्या शिक्षकांनी दि. १५ जूनपासून ऑनलाइन अध्यापन व शालेय कामकाज करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक अशा मिळून एकूण ३ हजार ३०२ शाळा आहेत. २ हजार ५७४ शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. ४८८ माध्यमिक शाळा व १४० कनिष्ठ महाविद्यालये आहेत.
दरवर्षी दीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर शाळा १५ जूनला सुरू होतात. मात्र, यंदा गतवर्षीप्रमाणे ऑनलाइन वर्ग भरणार आहेत. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी होणारा नवागतांचा स्वागतसोहळा ऑनलाइनच होण्याची शक्यता आहे. गतवर्षी जुलैमध्ये ऑनलाइन अध्यापनास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे गतवर्षीही नवागतांचा स्वागत सोहळा झाला नाही.
..................
शासनाच्या सूचनेनुसार दि. १५ जूनपासून पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग, विविध माध्यमांच्या शाळांचे ऑनलाइन अध्यापन सुरू करण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक सत्र १५ जूनला सुरू होणार असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू न होता अध्यापन ऑनलाइन होणार आहे.
- नीशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी