चिपळूण : येथील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमिक विभागात योग दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्रवीणकुमार आवले यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे दिले. मुख्याध्यापक, शिक्षक ऑनलाईन उपस्थित होते.
विद्यार्थी प्रतीक्षेत
रत्नागिरी : पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत अद्याप निर्णय शासनाने जाहीर केलेला नाही. गेले वर्षभरापासून परीक्षेची तयारी करण्यात येत असून, अद्याप मुले अभ्यासात व्यस्त आहेत. दहावी, बारावी तसेच पहिली ते अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा दोन वेळा बदलण्यात आल्या. परंतु परीक्षा परत घेण्याबाबत अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
शिक्षकांची पदे रिक्तच
देवरूख : संगमेश्वर तालुक्यात दिव्यांग विद्यार्थी असून, त्यांना अध्यापन करण्यासाठी अवघे चारच शिक्षक आहेत. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांची पदे रिक्त असल्याने मुलांची गैरसोय होत आहे.
मार्ग बदलला
राजापूर : शहरानजीकच्या कोंढेतड-गाडगीळवाडीकडे मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या रस्याचा मार्ग बदलण्यात येत असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील वरचीपेठ येथे पुलाचे काम सुरू आहे. नवीन मार्ग हा गाडगीळवाडीनजीक जात असल्याने या वाडीकडे जाणारा रस्ता बंद करून पर्यायी मार्ग काढण्याचे नियोजन सुरू आहे.
कचरा संकलन केंद्र
दापोली : जालगाव येथील निवेदिता प्रतिष्ठानतर्फे घनकचरा संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. आपलं घर आणि आवारातील स्वच्छ केलेल्या घनकचरा व्यवस्थित पिशवीत बांधून संकलन केंद्राकडे २६ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
ग़ुहागर : चिवेली येथील सुनील साळुंखे व दीप जनसेवा समिती (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील अंजनवेल येथील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सुनील साळुंखे, दीपक साळुंखे, विलास साळुंखे, स्वप्नाली साळुंखे आदी उपस्थित होते.
वेतन रखडल्याने गैरसोय
चिपळूण : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे फेब्रुवारी २०२१ चे वेतन अद्याप रखडले आहे. गेले वर्षभर वेतन अनियमित देण्यात आले. फेब्रुवारीचे वेतन अद्याप मिळालेले नसल्याने चालकांची गैरसोय झाली आहे.
मार्ग खड्ड्यातच
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील खोपी फाट्यापासून भोस्ते घाटातील काही अंतरापर्यंत चाैपदरीकरणाचे काम रखडले आहे. घाटातील मार्ग पुरता खड्ड्यात गेला आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे खड्ड्यांचा विस्तार वाढत असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शयनयान बससेवा सुरू
राजापूर : राजापूर आगार व जैतापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नाने अनलाॅकनंतर जैतापूर-सायन मार्गे बोरिवली ही शयनयान बससेवा पूर्ववत करण्यात आली आहे. या बसच्या प्रवासी भाड्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांना दिलासा प्राप्त झाला आहे.
लसीकरणाची मागणी
देवरूख : कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाने संगमेश्वर तालुक्यातील चार गावांचा प्रतिबंधात्मक क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) समावेश केला आहे. या सर्व गावांमध्ये लसीकरणाची माेहीम राबवून कोरोनामुक्तीचा उपक्रम नव्याने सुरू करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. विशेष लसीकरण मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे.