दापोली : कोरोनाचे थैमान राज्याच्या ग्रामीण भागात वाढत चालले असून, कोरोनावर उपाययोजना करण्यात राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात केवळ २४ तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असून, नियमानुसार तो किमान तीन दिवस उपलब्ध असणे गरजेचे आहे. जर वेळेत ऑक्सिजन पुरवठा झाला नाही तर २४ रुग्णांचे प्राण संकटात येऊ शकतात, अशी भीती भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
दापोली उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरची पाहणी माजी खा. किरीट सोमय्या यांनी गुरुवारी केली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत यांनी सोमय्या यांना कोविड सेंटरची पूर्ण माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, कोरोनाला अंकुश लावण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. मात्र, राज्याने ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे त्या मात्र केल्या जात नाहीत, असा आराेप त्यांनी केला.
कोरोनाच्या लसीबाबत बोलताना सोमय्या म्हणाले की, जगामध्ये केवळ ७ कंपन्यांना कोविडवरची लस उत्पादन करण्याची परवानगी असून, त्यातील २ कंपन्या या भारतामध्ये आहेत. या कंपन्या किती उत्पादन करू शकतात, याची पूर्ण कल्पना ही राज्य सरकार म्हणून मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना आहे. मात्र, आपल्या अपयशाचे खापर केंद्रावर फोडायचे म्हणून केंद्र सरकार लस पुरवत नाही, असा खोटा प्रचार केला जात आहे. वस्तुस्थितीत मात्र केंद्राकडून जास्तीत जास्त लसीचा पुरवठा हा महाराष्ट्राला केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने प्रत्येक राज्य सरकारला लस खरेदीचा अधिकार दिला असून, महाराष्ट्र सरकारने मात्र अद्याप कोणतीही लस खरेदी केलेली नाही. मात्र, १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आलेली असून, ही लस राज्य सरकारने खरेदी केल्याचे सांगितले जात असले तरी केंद्राच्या कोट्यातीलच लस वापरण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
राज्याच्या ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव असून राज्याचे आरोग्यमंत्री मात्र जालना व पुणे या भागाकडेच जास्त लक्ष देत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. वस्तुस्थिती पाहून हे मंत्री बोलत नाहीत. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय त्यांना झाल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनय नातू, उपाध्यक्ष केदार साठे, दीपक महाजन, भाऊ इदाते, तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष स्मिता जावकर, शहराध्यक्ष संदीप केळकर, जिल्हा सरचिटणीस संजय सावंत, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
.................................
दापाेली उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटची माजी खा. किरीट साेमय्या यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महेश भागवत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित हाेते.