पावस : लस घेण्याआधी काेराेना चाचणी करा, तरच प्राथमिक आराेग्य केंद्रावर लस घेण्यास या, असा फतवा रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात काढण्यात आला आहे. या नव्या फतव्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून, या आठमुठ्या धाेरणामुळे नाराजी व्यक्त हाेत आहे. या फतव्यामुळे अनेकांना लस न घेताच माघारी फिरावे लागले.
या नियमामुळे येथील आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्यात वाद हाेऊ लागले आहेत. आम्हाला यासंदर्भात शासनाचे आदेश दाखवा, अशी मागणी या आरोग्य केंद्रावर जमलेल्या ग्रामस्थांनी केली. आजही कोरोना चाचणीबाबत अनेकांच्या मनात संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे अनेकजण आपली चाचणी करण्यास घाबरत आहेत. मात्र, पावस येथील आराेग्य केंद्रावरील नव्या नियमामुळे अनेकजण लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डाेसचे नियाेजन करण्यात आले हाेते. सकाळपासूनच केंद्रावर लोकांनी गर्दी केली होती. त्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नाेंदणी होण्यास विलंब होत आहे. त्यातच काेराेना चाचणीची सक्ती करण्यात आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.