मंडणगड : जिल्ह्यात काेराेना संसर्गापासून पिछाडीवर असलेल्या मंडणगड तालुक्यात कोविड लसीकरणाची धुरा केवळ शासकीय रुग्णालयावरच अवलंबून आहे. तालुक्यात ४५ वर्षांवरील १५४७६ नागरिक असून, यातील केवळ ४७६ जणांनीच लस घेतली आहे. हे प्रमाण अत्यल्प असल्याने लसीबाबत जनजागृती करणे गरजेचे बनले आहे.
तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व १ ग्रामीण रुग्णालय याठिकाणी कोविड लस देण्यात येत आहे, तर एकही खासगी रुग्णालय कोविड लस देण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी-शर्थींच्या पूर्ततेत येत नसल्याने एकाही खासगी रुग्णालयात काेविड लस देण्यात येत नाही. आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार या दिवशी लस देण्यात येते. आरोग्य विभागाकडे अपुरे कर्मचारी असले तरी लसीकरणासाठी आवश्यक असणारे कर्मचारी उपलब्ध आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांना जनजागृती आणि कागदोपत्री कामकाजात गुंतवल्यास लसीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात मार्च २०२० ते २ फेब्रुवारी २०२१ या एक वर्षाच्या कालावधीत १५३ रुग्ण पाॅझिटिव्ह आले आहेत, तर कोविडच्या दुसऱ्या फेरीत २६ फेब्रुवारी २०२१ ते ४ एप्रिल २०२१ या कालावधीत ३७ रुग्ण पाॅझिटिव्ह आले आहेत. याचाच अर्थ तालुक्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
- तालुक्यात लस उपलब्ध मात्र जनतेचा अत्यल्प प्रतिसाद
- लस घेण्यासंदर्भात जनतेमध्ये भीतीचे वातावरण
- ज्येष्ठ नागरिकांची संख्याही अत्यल्प.
- शासकीय कर्मचारी संख्या लक्षणीय आहे.
- होळी सणामुळेही लसीकरण मंदावलेले आहे.