राजापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्वरात पाेलीस ताब्यात घेणार असल्याचे वृत्त पसरताच आमदार नीतेश राणे सिंधुदुर्गातून संगमेश्वरकडे येण्यासाठी निघाले. मात्र, राजापूर तालुक्यातील हातिवले येथील तपासणी नाक्यावर त्यांची गाडी थांबविण्यात आली. काही वेळाने त्यांची व पायलट अशा दाेनच गाड्या साेडण्यात आल्या, तर उर्वरित सर्व गाड्या सिंधुदुर्गकडे परत पाठविण्यात आल्या.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा रत्नागिरीत दाखल झाली हाेती. त्यामुळे सिंधुदुर्गवरून राणे समर्थकांसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर रत्नागिरीत दाखल हाेणार असल्याचा अंदाज घेऊन मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांनी जादा कुमक ठेवण्यात आली हाेती. हातिवले (ता. राजापूर) येथील तपासणी नाक्यावर राजापूर पोलीस तैनात करण्यात आले हाेते. सिंधुदुर्गकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात होती. दरम्यान, रत्नागिरीकडे चाललेले कणकवलीचे आमदार नीतेश राणे यांची व त्यांच्यासमवेत असलेली पायलट गाडी अशा दोन गाड्या पोलिसांनी रत्नागिरीकडे साेडल्या. मात्र, त्यांच्यासमवेत आलेल्या अन्य पंचवीस ते तीस गाड्यांना परवानगी नाकारत त्या पुन्हा सिंधुदुर्गकडे पाठविण्यात आल्या.