रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू येथे सध्या माती परीक्षण केले जात आहे. ही माती जगातील सर्वात मोठ्या प्रयोगशाळेत पाठवली जाईल. तेथे त्याची तपासणी होईल आणि त्या अहवालानंतरच बारसू प्रकल्प या जागेत उभारणे योग्य आहे की नाही, हे ठरवले जाईल, असे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टपणे सांगितले.बारसू येथे सध्या माती परीक्षणासाठी बोअर खोदण्यात येत आहेत. त्याबाबतही खूप मोठे गैरसमज पसरवले जात आहेत. या बोअरमध्ये कंपनीसाठी पिलर उभारले जाणार आहे, अशी माहिती लोकांमध्ये पसरवली जात आहे. मात्र हे खोदकाम केवळ माती परीक्षणासाठीच होत आहे. ही माती प्रकल्प उभारण्यायोग्य असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला, तरच येथे प्रकल्प उभा केले जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
बारसूत जमीन घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणारराजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प क्षेत्रात सरकारी अधिकाऱ्यांनी जागा घेतल्या आहेत का, त्या कशा घेतल्या आहेत, याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली असून, दोन दिवसात ही चौकशी केली जाईल, अशी माहितीही मंत्री उदय सामंत यांनी दिली. ज्यांनी १३७ गुंठे जमीन घेतल्याचा आक्षेप घेतला जात आहे, त्या महावितरणच्या अभियंत्याची बदली आपण मुंबईला केल्याचेही त्यांनी सांगितले.