आॅनलाईन लोकमत
राजापूर (जि. रत्नागिरी), दि. २२ : नाणार परिसरात होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचा पर्यावरणाला धोका होणार नाही, या हमीसहित समस्त प्रकल्पग्रस्तांच्या आग्रही मागण्यांचा विचार झाला तरंच या प्रकल्पाला सहकार्य करु, अशी भूमिका नाणारमधील जनहित संघर्ष समितीने घेतली असून, आपल्या काही मागण्यांबाबत सोमवार, दिनांक २४ जुलै रोजी मुंबईत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन समितीचे सदस्य चर्चा करणार आहेत, अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा असा सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा रिफायनरी प्रकल्प तालुक्यातील नाणार परिसरात शासनाने मंजूर केला असून, एकूण १४ गावातील १५ हजार एकर जागा त्यासाठी संपादीत करण्यात आली आहे. स्थानिक जनतेने या प्रकल्पाला कडाडून विरोध सुरु केला असून, संघर्षाला सुरुवातदेखील झाली आहे. प्रकल्पाला असलेल्या विरोधाची धार आणखी वाढवण्यासाठी नाणार परिसरातील १४ गावांनी एकत्र येत जनहित संघर्ष समितीची स्थापना केली आहे.
नाणारचे रामकृष्ण पेडणेकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या माध्यमातून संघर्ष आणखी तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला असतानाच आता अचानक संघर्ष समितीने सबुरीचे धोरण स्वीकारताना जर शासन नियोजित रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका होणार नाही, अशी ठोस हमी देणार असेल तर प्रकल्पाबाबत पाठिंबा देण्यास तयार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.