रत्नागिरी : यावर्षी नैसर्गिक बदलामुळे आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा उशिरा असतानाच आता थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मजगाव, शीळ परिसरात थ्रीप्सचा प्रादुर्भाव आढळल्याने शेतकरी धास्तावले आहेत.यावर्षी पावसाळा लांबल्याने जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. त्यामुळे पालवी जून होऊन मोहोर प्रक्रिया जानेवारीपासून सुरू झाली. थंडी उशिरा सुरू झाल्याने मोहोरच उशिरा आला. शिवाय फळधारणाही कमी आहे.
सध्या कणी ते सुपारी एवढ्या आकाराचा आंबा झाडावर आहे. त्यातच थ्रीप्सचे संकट उद्भवले आहे. हवामानातील बदलामुळे पालवीवर तुडतुडा, उंटअळी, बुरशीचा प्रादुर्भाव झाला होता. हवामानाचा अंदाज घेत कीडरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत आहे.
मोहोरावरील उंटअळीच्या प्रादुर्भावामुळे मोहोराचा फुलोरा खाऊन काड्या शिल्लक राहात होत्या. शेतकऱ्यांनी कृषिशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उंटअळीवर नियंत्रण मिळविले असतानाच आता थ्रीप्सला सामोरे जावे लागत आहे.ऑगस्टमध्ये आलेल्या मोहोराचे शेतकऱ्यांनी संरक्षण केल्याने तयार झालेला आंबा बाजारात येऊ लागला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, यावर्षीच्या हंगामातील आंबा उशिरा बाजारात येणार आहे.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे मध्येच हा आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे. नवीन मोहोराला फळधारणा होत असतानाच थ्रीप्समुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थ्रीप्सच्या प्रादुर्भावामुळे फळ चिकूप्रमाणे होते. थ्रीप्सपासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.
नैसर्गिक स्थित्यंतराचा परिणाम दरवर्षी आंबा पिकावर होऊन आंबापीक धोक्यात येत आहे. कीडरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणतानाच थ्रीप्सचे संकट उद्भवले आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कीटकनाशक फवारणीसाठी सूचना करणे आवश्यक आहे.- राजन कदम,बागायतदार, मजगाव,रत्नागिरी