लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे एप्रिलमध्ये कडक संचारबंदी शासनाने जारी केल्यापासून मंदिरेही बंद करण्यात आली. आता अनलाॅक झाले असून, निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. परंतु, मंदिरे खुली करण्याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भाविकांना मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊनच समाधान मानावे लागत आहे.
गतवर्षी कोरोनामुळे मार्चमध्ये लाॅकडाऊन झाले, त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली. नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत शासकीय नियमांचे पालन करत मंदिरे खुली होती. मंदिरे खुली असल्याने मंदिर परिसरातील विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू होता. मात्र, जेमतेम चार महिनेच भाविकांना थेट देवदर्शन घेता आले. त्यानंतरच्या लॉकडाऊनमध्ये मंदिरे पुन्हा बंद झाल्यामुळे पूजेचे साहित्य, प्रसाद, खेळणी, खाद्यपदार्थ विक्रेते आर्थिक संकटात सापडले. गतवर्षी आठ महिने आणि यावर्षी गेले तीन महिने या व्यावसायिकांना मंदिरे बंद असल्याची झळ सोसावी लागत आहे. अनेक कुटुंबांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरातील नित्य पूजा सुरु असून, अन्य धार्मिक विधी बंद असल्याने पुजारीसुध्दा आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.
आता निर्बंध शिथील करतानाच विविध व्यवसायांना परवानगी देण्यात आली. मात्र, मंदिरे अद्याप बंदच आहेत. त्यामुळे अजून किती दिवस कळसाचे दर्शन घ्यावे?
- शशिकांत देसाई, भाविक
अनलाॅकमुळे शिथिलता जारी करतानाच मंदिरे सुरू करण्यासाठीही परवानगी द्यावी. शासकीय नियमावलीचे पालन करून मंदिरे खुली करण्यात यावी, जेणेकरून भाविकांना दर्शन तरी सुलभ होईल. अद्याप किती दिवस दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
- ऋतुजा नागवेकर, भाविक
गेल्यावर्षी आठ महिने व गेले सलग तीन महिने मंदिरे बंद आहेत. मंदिरातील नित्य पूजा सुरू असली तरी भाविकांसाठी मंदिर बंद आहे. त्यामुळे भाविकांच्या माध्यमातून होणारी पूजा, अभिषेक व अन्य धार्मिक विधी बंद आहेत. मंदिरे बंद असल्याने पुजारीही घरीच आहेत. यातून अनेक कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- अमित घनवटकर, पुजारी
मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांची वर्दळ थांबली आहे. भाविक नसल्यामुळे व्यवसायही कोलमडले आहेत. व्यवसायातील गुंतवणूक, विजेची बिले, देखभाल-दुरूस्ती खर्च, व्यवसायासाठी घेतलेले कर्ज व त्याचे हप्ते यांची सांगड घालणे अवघड झाले आहे.
- अशोक काळोखे, हाॅटेल व्यावसायिक, गणपतीपुळे
कोरोनामुळे गतवर्षीपासून आर्थिक झळ सोसावी लागत आहे. व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, शासनाने शासकीय निर्बंधांत मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी द्यावी, जेणेकरून छोट्या व्यावसायिकांची उपासमार टळेल.
- दिनेश ठावरे, नारळ, शहाळी विक्रेता, गणपतीपुळे