लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : येथील नगरपरिषद व अपरांत कोविड हॉस्पिटल यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कोकणातील एकमेव सुसज्ज कोविड हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा २६ जून रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.
कोकणात प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हे हॉस्पिटल उभारले आहे. या रुग्णालयात तीन अतिदक्षता विभाग वेगवेगळ्या प्रकारे कार्यरत असणार आहेत. येथील वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय अनुभवी आणि नावलौकिक मिळविला असणारे डॉ. विजय रिळकर, डॉ. यतीन जाधव, डॉ. यशवंत देशमुख, डॉ. अब्बास जबले, डॉ. शेखर पालकर, डॉ. गोपीचंद वाघमारे आणि डॉ. वैशाली जाधव यांचे या कोविड हॉस्पिटलमध्ये सतत मार्गदर्शन व जातीने लक्ष असणार आहे. या ५२ बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये लहान मुलं आणि मोठी माणसं अशा दोघांसाठी हायब्रीड व्हेंटिलेटर हाय फ्लो ऑक्सिजन मशीन, डिफिब्रिलेटर, बायप्याप मशीन व सी पॅप मशीन, अद्ययावत मल्टिपरामॉनिटर्स, ऑक्सिजन जनरेटर, एक्सरे मशीन सर्जीकल सपोर्टसाठी ऑपरेशन थिएटर इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे.
या हॉस्पिटलमध्ये सुकाणू समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये सुचय रेडिज, शिरीष काटकर, सचिन कदम, प्रशांत यादव यांचा समावेश असणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, सदानंद चव्हाण, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी वैभव विधाते उपस्थित राहणार आहेत.