जावेद शेख - शृंगारतळी -गुहागर समुद्रकिनारी पर्यटकांसाठी बांधण्यात आलेल्या व्ह्यू गॅलरीज व्यावसायिकांना खुणवू लागल्या आहेत़ बीचवर असलेल्या तीन गॅलरीच्या खालच्या मोकळ्या जागेत बारा व्यावसायिक गाळे निर्माण होऊ शकतात, असे चित्र दिसत आहे़या माध्यमातून स्थानिकांनाही रोजगाराची संधी प्राप्त होऊ शकते. गाळ्याच्या स्वरूपात स्थानिक बेरोजगारांना रोजगारासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास काही कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न कायमचा सुटू शकतो. याकडे येथील नगरपंचायतीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. गुहागर समुद्रकिनारी सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूणतर्फे बारावा वित्त आयोग सागरी किनारा व सृष्टी पर्यटन विकास कार्यक्रमअंर्तगत दोन वर्षांपूर्वी येथील बीचवर तीन व्ह्यू गॅलरी बांधण्यात आल्या आहेत. या गॅलरीमुळे समुद्रकिनाऱ्याला शोभा आली आहे़ लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या गॅलरीकडे स्थानिक प्रशासनाने व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहिल्यास प्रशासनाला गॅलरीच्या मोकळ्या जागेतून आर्थिक उत्पन्न निर्माण करण्याचे साधन मिळू शकते. त्याचबरोबर स्थानिक तरूणांना या माध्यमातून रोजगाराची संधी प्राप्त होऊ शकते. एका गॅलरीच्या मागे चार व्यावसायिक गाळे निर्माण होण्याची क्षमता आहे. तीन गॅलरीत चक्क बारा गाळे निर्माण होतात़ गेल्या दोन वर्षांपासून ही जागा सताड उघडी आहे. याठिकाणी स्थानिक प्रशासनाने संधी प्राप्त करून दिल्यास बारा कुटुंबांना रोजगाराची संधी मिळू शकते. गुहागरच्या समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ वाढली असून, आता या ठिकाणाकडे व्यावसायाच्या दृष्टीने पाहिल्यास त्याचा फायदा परिसराला होऊ शकेल.गुहागर समुद्रकिनारी पर्यटकांसाठी व्ह्यू गॅलरी. गॅलरीच्या मागे चार गाळे तयार झाल्यास उत्पन्नाचे साधन. रोजगाराची संधी निर्माण झाल्यास त्यातून फायदा. किनाऱ्याची शोभा अधिक वाढणार.
व्ह्यू गॅलरीज खुणावताहेत व्यावसायिकांसाठी संधी
By admin | Published: March 09, 2015 9:26 PM