लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : हापूस आंबा ग्राहकांना ऑनलाईन पोर्टलद्वारे आपली मागणी थेट शेतकऱ्यांकडे नोंदविण्यासाठी कृषी पणन मंडळाने सुविधा उपलब्ध केली आहे. कृषी पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावरील buyers sellers information लिंकद्वारे अथवा bs.msamb.com या लिंकद्वारे खरेदीदारांना आंबा नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोकणातील हापूस आंब्याचा आकर्षक रंग, अवीट गोड चव, मोहक रसरशीत मऊगर व मनमोहक सुवास अशी ऐकाहून एक सरस वरदाने निसर्गाने दिली आहेत. हापूस आंबा महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील खवय्यांची रसना तृप्त करतो. त्यामुळे जगभरातील ग्राहकांकडून हापूसला चांगली मागणी होते.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षी कोकणातील हापूस आंबा शहरातील ग्राहकांना थेट कोकणातील उत्पादकांद्वारे उपलब्ध व्हावा, यासाठी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे आंबा महोत्सव आयोजन अशक्य आहे. कोकणातील आंबा उत्पादकांना विक्रीसाठी शहरात यावे लागू नये तसेच शहरातील ग्राहकांनाही घराबाहेर किंवा सोसायटी बाहेर पडावे लागू नये, यासाठी उत्पादक व ग्राहक या दोघांनाही ऑनलाईन पोर्टलद्वारे आंबा खरेदी-विक्रीची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावरील buyers sellers information लिंकद्वारे अथवा bs.msamb.com या लिंकद्वारे खरेदीदारांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कृषी पणन मंडळाने संबंधित पोर्टलवर कोकणातील हापूस आंबा उत्पादकांची नोंदणी सुरू केली आहे. त्यामध्ये आंबा उत्पादकांचे नाव, संपर्क क्रमांक, आंबा उपलब्ध तपशील आदी माहिती पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुणे, मुंबई तसेच इतर शहरांतील वैयक्तिक ग्राहक अथवा सहकारी गृहनिर्माण संस्था इत्यादी सर्वांना त्याची मागणी संबंधित पोर्टलवर नोंदविता येईल किंवा विशिष्ट आंबा उत्पादकांशी संपर्क साधता येणार आहे.
आंबा खरेदीबाबत उत्पादक तातडीने कार्यवाही करून शहरातील ग्राहकांना त्यांच्या घरी आंबा पोहोच करू शकतील. आंबा खरेदीकरिता किमान शंभर डझनची मर्यादा ठेवण्यात आली आहे. कृषी पणन मंडळाकडून कोकणातील दर्जेदार व नैसर्गिकरित्या पिकविलेला हापूस आंबा शहरातील ग्राहकांना थेट उत्पादकांकडून उपलब्ध व्हावा, यासाठी आंबा उत्पादकांनी पोर्टलवर विक्रेता (seller) म्हणून व ग्राहकांनी कृषी पणन मंडळाचे पोर्टलवर खरेदीदार (BUYER) म्हणून नोंदणी करावी व उपलब्ध आंबा अथवा आंब्यांची मागणी नोंदवावी, असे आवाहन कृषी पणन मंडळातर्फे करण्यात आले आहे.