राजापूर : तालुक्यातील देवाचेगोठणे - सोगमवाडी येथे मृत व्यक्तीचा धार्मिक विधी प्रसंगी भावकीने बहिष्कृत केल्याच्या तक्रारीप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी रत्नागिरी यांनी उपविभागीय दंडाधिकारी राजापूर यांना देण्यात आले आहेत, तशी माहिती तक्रारदार सदानंद झिंबरे यांनी दिली आहे.
देवाचेगोठणे सोगमवाडी येथील सदानंद तानाजी झिंबरे व समस्त झिंबरे भावकी यांनी सोगमवाडी गावकर यांच्यासह ग्रामस्थांच्या विरोधात महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपविभागीय दंडाधिकारी राजापूर यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सदानंद झिंबरे यांनी या दाखल केलेल्या तक्रार अर्जात आमचे चुलते उमाजी विश्राम झिंबरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर त्यांचे अंतिम विधी, तेरावा व चौदावा विधी करण्यात आले. याबाबत सोगमवाडी गावकर तसेच फौजदार व इतर ग्रामस्थांना आमंत्रण करूनही या विधिसाठी उपस्थित न राहता आमच्यावर सामाजिक बंधने लादून बहिष्कृत केले. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी राजापूर येथील उपविभागीय दंडाधिकारी यांना दिल्याची माहिती सदानंद झिंबरे यांनी दिली आहे.