लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शिक्षकांच्या बदल्यांसाठी बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या तसेच या बदल्यांसाठी अवघड क्षेत्र घोषित करण्याचे आदेश शासनाने जिल्हा परिषदेला दिले आहेत़ या आदेशामुळे जिल्हा परिषदेला नव्याने बदली प्रक्रिया राबवावी लागणार आहे.शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुगम व दुर्गम अशा दोन भागांची यादी तयार केली आहे. प्रथम ही यादी शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आली. त्यानंतर अंतिम यादी जिल्हा परिषदेच्या रत्नागिरी आणि चिपळूण या दोन्ही बांधकाम विभागांनी केली होती. या याद्या तयार केल्यानंतर त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षकांकडून त्यावर आक्षेप घेण्यात आले. जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात आलेल्या याद्यांमध्ये महामार्गावरील व काही रस्त्यांच्या जवळ असलेल्या भागातील शाळा दुर्गम ठिकाणी, तर दुर्गम भागातील काही शाळा सुगम भागात दाखवण्यात आल्या होत्या. याद्यांमध्ये चुका झाल्याचे शिक्षण सभापती दीपक नागले यांच्या लक्षात आल्यानंतर ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मिश्रा यांनी नवीन याद्या तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षण विभागाकडून आता नवीन याद्या तयार करण्यात आल्या आहेत.
अवघड क्षेत्र घोषित करण्याचे आदेश
By admin | Published: June 02, 2017 11:13 PM