रत्नागिरी : विकासकाने सद्गुरु हौसिंग सोसायटी, देवरुखला येत्या ४५ दिवसात जमीन मालकी हस्तांतरण करून द्यावी, असा आदेश रत्नागिरी ग्राहक मंचाने दिला आहे.संस्था स्थापन होऊन प्रदीर्घ काळ उलटला तरी विकासक संतोष शांताराम महाडिक हे सद्गुरु हौसिंग सोसायटी, देवरुख या संस्थेच्या नावे जमीन हस्तांतरित करून देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यास्तव संस्थेने अॅड. दीपक पटवर्धन यांच्यामार्फत रत्नागिरी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली होती.कन्व्हेअन्स करुन न देणेही सदोष सेवा आहे. कन्व्हेअन्स करुन देणे, ही विकासकाची जबाबदारी आहे, असे स्पष्ट मत नोंदवत ४५ दिवसात विकासकाने संस्थेच्या नावे कन्व्हेअन्स डीड करुन द्यावे तसेच सदोष सेवेबद्दल २० हजार व खर्चापोटी ५ हजार रक्कम संस्थेला अदा करावेत, असा निकाल रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार मंचाने दिला आहे.सचिव अभय प. शेट्ये यांच्यामार्फत संस्थेने मे. ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. कन्व्हेअन्स डीड मुदतीत करुन दिले नाही, ही विकासकाची सेवेतील त्रूटी आहे, असे मत नोंदवताना संस्था नुकसानभरपाईसह खर्चाची रक्कम मिळणेस पात्र आहे, असा निष्कर्ष नोंदवत ४५ दिवसात कन्व्हेअन्स डीड करुन देण्याचा आदेशही ग्राहक मंचाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
जमीनमालकी हस्तांतरण त्वरित देण्याचे आदेश
By admin | Published: December 17, 2014 9:38 PM