रत्नागिरी : सद्यपरिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यायात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शासनाच्या अधिसूचनेनुसार काही खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांच्या उपचाराकरिता उपलब्ध करू देण्यात आली आहेत. या रुग्णालयांना शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच उपचाराचा खर्च घ्यावा लागणार आहे. त्यासाठी सनदी लेखापाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील १५ खासगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील १५ अंगीकृत खासगी रुग्णालयांमधील कोविड पेशंटच्या बिलांच्या तपासणीकरिता १० तपासणी पथके कार्यरत असून रत्नागिरी जिल्ह्यातील लेखाविषयक काम पाहणाऱ्या २८ अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. शासनाच्या ३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या अधिसूचनेमधील परिशिष्ट C नुसार कोरोना रुग्णांकडून निश्चित केलेल्या दराप्रमाणेच बिलाची आकारणी करावयाची आहे. त्यानुसार अलगीकरण कक्षातील रुग्णांकडून प्रतिदिन ४ हजार रुपये, व्हेंटिलेटरशिवाय अतिदक्षता कक्ष ७ हजार ५०० तर व्हेंटिलेटरसह अतिदक्षता विभागासाठी ९ हजार रुपये याप्रमाणे आकारणी करावयाची आहे.
रुग्णांच्या अधिक तपासणींकरिता कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे तुलानत्मक दर ३१ डिसेंबर २०१९ नुसार असावेत. कोरोना चाचणीचे दर ३१ ऑगस्ट २०२० च्या मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्र.९ नुसार असावेत. इम्युनोग्लोब्युलीन, मेरोपेनेम, रेमडेसिविर, फ्लॅविपिरवीर, टोसिलिझुम्यॅब इंजेक्शन आदी उच्च प्रतीची औषधे व पूरक आहार, सीटी स्कॅन, एमआरआय, पेट स्कॅन किंवा प्रयोगशाळा चाचण्या उच्च प्रतीची तपासणी, त्यांची तुलनात्मक आकारणी ३१ डिसेंबर २०१९ रोजी हॉस्पिटल ज्या दराने करत होते, त्याच दराने करण्यात यावी, रुग्णांच्या अधिक तपासणींकरिता कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे तुलानात्मक दर ३१ डिसेंबर २०१९ नुसार असावेत, तसेच कोरोना चाचणीचे दर ३१ ऑगस्ट २०२० च्या मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्र.९ नुसार असावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी खासगी रुग्णालयांना दिले आहेत.
या दरात समाविष्ट असलेल्या बाबी
रुग्णांची तपासणी करणे, त्यांच्यावर देखरेख ठेवणे, रक्त, लघवी, एच.आय.व्ही, कावीळ, किडनी आदी संबधित चाचण्या, २डी इको, सोनोग्राफी क्ष-किरण चाचणी व इसीजी आदींसोबतच औषधे, रुग्णाला आवश्यक ऑक्सिजन, तज्ज्ञांशी सल्लामसलत, बेड सुविधा, नर्सिंग सुविधा, जेवण तसेच Ryles tube insertion Urinary Tract catheterization संबधित बाबी.
समाविष्ट नसणाऱ्या बाबी
पीपीई किट (जास्तीत जास्त ६०० प्रति दिन प्रति रुग्ण) व जास्तीत जास्त १२०० रुपये अतिदक्षता विभागाकरिता. यापेक्षा अधिकचा खर्च असल्यास त्या संबंधीचे स्पष्टीकरण आवश्यक.