मेहरुन नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पारंपरिक पध्दतीने शेती न करता, अत्याधुनिक व तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीकडे व्यावसायिकदृष्ट्या लक्ष केंद्रित केले तर चांगले अर्थार्जन प्राप्त होऊ शकते, हे रत्नागिरी तालुक्यातील खरवते येथील प्रवीण जोशी यांनी आपल्या कृतीतून सिध्द केले आहे. तीस वर्षे ते शेतीतून उत्पन्न मिळवित आहेत. ७० एकर क्षेत्रावर त्यांनी आंबा, काजू, नारळ, सुपारी लागवड करून बागायती फुलविली आहे. नारळ, सुपारीमध्ये अंतर्गत काळीमिरी, जायफळ या मसालावर्गीय पिकांची लागवड केली आहे.
शेतीला जोड व्यवसाय म्हणून ते गाई-म्हशींचा सांभाळ करीत आहेत. त्यातून दुधाचा व्यवसाय होत असून, शेणापासून खत व गोमूत्रापासून जीवामृत तयार करून शेतीसाठी वापर करीत आहेत. बागेतील पालापाचोळा तसेच गावातील अन्य शेतकऱ्यांकडील शेण व लेंडी विकत घेऊन त्यापासून सेंद्रीय खत तयार करून बागायतींसाठी वापरत आहेत.
गावातील पडिक जमीन भाडेतत्त्वावर घेऊन त्यावर भात लागवड करून पडिक जमीन लागवडीखाली आणली आहे. ६०० आंबा झाडे असून, दरवर्षी दीड हजार पेटी आंबा होतो. मुंबई, पुणेसह खासगी विक्रीवर भर आहे. दोन हजार काजू लागवड असून दरवर्षी चार ते पाच टन काजू बी उत्पादन त्यांना प्राप्त होते. १७५ नारळ असून वर्षाला पाच हजार नारळ तर १७५ सुपारीपासून २५० ते ३०० किलो सुपारी त्यांना प्राप्त होत आहे. गावातील शेतकऱ्यांनाही चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी सर्व शेतकऱ्यांची दरवर्षी २० ते २२ टन काजू बी संकलित करून विक्री करीत आहेत.
- नारळ, सुपारीमध्ये अंतर्गत मसालावर्गीय पिकांची लागवड केली आहे.
- पाच हजार नारळ प्राप्त होत असून स्थानिक पातळीवर तसेच शहरात विक्री होत आहे.
- ओली सुपारी किरकोळ स्वरूपात विक्री होत असली तरी वर्षाला २५० ते ३०० किलाे सुपारी प्राप्त होत आहे.
काळीमिरीतून उत्पन्न
नारळ, सुपारीवर काळीमिरीचे वेल चढविण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांना काळीमिरी विक्रीतून एक लाख रुपये प्राप्त झाले होते. मात्र गतवर्षी एका रोगामुळे ९० टक्के काळीमिरी रोपांचे नुकसान झाले. मात्र न डगमगता पुन्हा नव्याने काळीमिरी लागवड केली आहे. पाच वर्षांपूर्वी लागवड केलेल्या जायफळांचे उत्पादन मात्र आता सुरू झाले आहे. नारळ बागेतून मसाला पिके घेता येत असल्यामुळेच या बागेला ‘लाखी’ बाग संबोधले गेले आहे. नवीन लागवड, खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण ते उत्पादन बाजारात पाठवेपर्यंत विशेष मेहनत घेत असल्यामुळे त्यांच्याकडील उत्पादनाचा दर्जा उत्तम राखला गेला आहे.