अडरे : चिपळूण तालुक्यात निवास व शौचालय व्यवस्था नसलेल्या गावांमध्ये एस. टी.ची रात्रीची सेवा बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना, चिपळूण आगारातर्फे देण्यात आला आहे. चालक व वाहकांसाठी निवास व शौचालय व्यवस्था उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधित प्रशासनाला सूचना देण्याबाबत संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले होते. जिल्ह्यात एकूण २०३ गावात एस. टी. बसेस रात्रवस्तीला जात असून, अद्याप १५० गावांमध्ये निवास व शौचालय व्यवस्था नाही. अनेक गावे ग्रामस्वच्छता अभियानअंतर्गत निर्मल व हगणदारी मुक्त घोषित झाल्याने वाहक व चालकांना रात्री उघड्यावर प्रात:विधीसाठी जावे लागते. याबाबत संघटनेतर्फे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चाही झाली. शासनाने भारत स्वच्छता अभियान सुरु केले आहे. अशा परिस्थितीत चालक, वाहकांना निवास व शौचालय याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी व्यवस्था नसेल, अशा ठिकाणी रात्रवस्तीला जाण्यास कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. ग्रामीण भागात निवास व शौचालय व्यवस्था होणे आवश्यक असून संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेतर्फे चिपळूण विभागीय अध्यक्ष रवींद्र लवेकर यांनी दिले आहे. (वार्ताहर)
...अन्यथा वस्तीची एस. टी. सेवा बंद होणार
By admin | Published: November 21, 2014 10:28 PM