राजापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत काहीसा सुरक्षित राहिलेला राजापूर तालुका दुसऱ्या लाटेत मात्र पुरता असुरक्षित झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच असून, ग्रामीण भागात गाव, वाडी आणि वस्तीवर कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. तालुक्यातील अपुऱ्या आरोग्यविषयक सेवा-सुविधा आणि साधनसामग्रीत वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. कडक लॉकडाऊनमध्येही तालुक्यात रुग्णांचा आकडा वेगाने वाढल्याने स्थानिक पातळीवर प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागातील या वाढत्या कोरोना संसर्गाच्या आकडेवारीमुळे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी, माझे गाव, माझी जबाबदारी’ ही अभियाने पुरती फसल्याचेही पुढे आले आहे. ग्रामीण भागातील ग्रामकृतीदलांना अधिक सतर्क करून जनतेमध्ये याबाबत जनजागृती करतानाच पुन्हा एकदा गावनिहाय आरोग्य तपासणी मोहीम राबविणे आवश्यक आहे.
प्रारंभी लॉकडाऊन आणि त्यानंतर ३ जून ते ९ जून या काळात प्रशासनाने लागू केलेले कडक लॉकडाऊनही फसल्याचेच पुढे आले आहे. उलट या कडक लॉकडाऊनच्या कार्यकाळात तालुक्यात २ जून ते ८ जून या काळात तालुक्यात तब्बल ५२८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कडक लाॅकडाऊनची मर्यादा केवळ शहरापुरतीच मर्यादित राहिली व ग्रामीण भागात प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग थांबण्याऐवजी वाढतच गेल्याचे आकडेवारीने सिध्द केले आहे.
तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरापेक्षा ग्रामीण भागात संसर्ग अधिक वाढला आहे. मंगळवार ८ जूनअखेर तालुक्यात एकूण २९३५ कोरोनाबाधित रुग्णांची नोद झाली आहे. यातील १८४१ रुग्ण हे उपचारांती बरे झाले आहेत; तर सध्या ९७५ रुग्ण ॲक्टिव्ह असून, ते विविध ठिकाणी उपचार घेत आहेत; तर आजपर्यंत तालुक्यात दुर्दैवाने ११९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्ण व मृत्यू वाढीचा दर हा वेगवान आहे.
गेल्या वर्षभरात तालुक्यात शासकीय कोरोना रुग्णालय व कोरोना प्रतिबंधक चांगल्या आरोग्य सेवाही तालुक्यात उपलब्ध झाल्या नाहीत़. रायपाटण व धारतळे येथे कोविड सेंटर सुरू झाली, पण सेवा-सुविधांची त्या ठिकाणी वानवा आहे. तर आता ओणी व रायपाटण येथे कोविड रुग्णालये झाली; पण तेथे पुरेसे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे केवळ औपचारिकता पूर्ण करणे हाच हेतू आहे की काय, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.
------------------------
कोराेना चाचणीत आपला अहवाल पॉझिटिव्ह आला, तर आपल्याला कोविड सेंटरला नेतील; पण तेथे तर काहीच सुविधा नाहीत, आपल्याला रत्नागिरीत अथवा कोल्हापूरला उपचारासाठी जावे लागेल; पण आपली तर तेवढी आर्थिक परिस्थितीही नाही. या विवंचनेमुळे आणि काळजीमुळे मग अनेकांनी सर्दी, ताप-खोकला यांसारखे आजार अंगावरच काढले आहेत. अंतिम टप्प्यात त्याचे व्हायचे तेच परिणाम झाले.