देवरुख : एकेकाळी देशी गायींच्या दुधाने समृध्द असणाऱ्या आपल्या देशात सध्या मात्र देशी गायींचे दूध मिळणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे सध्या देशी गाय बचाव ही मोहीम विविध ठिकाणी राबविली जात आहे.
या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव येथील पराग जंगम याने गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरी देशी गायींचे महत्त्व सांगणारा देखावा साकारला आहे.कोकणात घरोघरी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात विविध प्रकारचे आकर्षक देखावे साकारले जातात. गणेशोत्सवाच्या आठवडाभर आधीपासूनच काही हौशी गणेशभक्त हे देखावे तयार करण्याचे काम करत असतात.
धार्मिक, पर्यावरणपूरक तसेच प्रबोधनात्मक विषय या देखाव्यांतून अनेकजण मांडत असतात. अशाच प्रकारचा देखावा तालुक्यातील पाटगाव येथील पराग जंगम याने वडील प्रकाश जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी साकारला आहे. गणेशोत्सवापूर्वी आठवडाभर अगोदरपासूनच पराग हा देखावा साकारण्यासाठी मेहनत घेत होता.देशी गायी बचाव हा विषय घेऊन पराग याने आपल्या घरी देशी गायींचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व पटवून देणारा देखावा साकारताना कागद व पुठ्याचा वापर केला आहे. त्याद्वारे विशेष माहिती देणारे फलक व चित्रे या देखाव्यात मांडली आहेत. त्या
चबरोबर देशी गायींचे महत्त्व सांगणारा आॅडिओही यामध्ये लावण्यात आला आहे. परागने साकारलेला हा आगळावेगळा प्रबोधनात्मक देखावा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.पराग हा इलेक्ट्रीशन म्हणून काम करतो. आपल्या कामातून वेळ काढत त्याने यावर्षी हा प्रबोधनात्मक विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. देशी (गावठी) गायींचे दूध, तूप, गोमूत्र हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
या गायींचे संगोपन व संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. पोस्टर्स व आॅडिओद्वारे देशी गायींचे महत्त्व जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे पराग याने सांगितले.